Pimpri : गावाशी जोडलेली नाळ साठ वर्षांनंतरही कायम ठेवत केली पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – लहानपणी गावाशी जोडलेली नाळ जन्मभर जोडून ठेवते. नोकरी आणि अन्य कारणांमुळे सोडल्यानंतरही गावक-यांच्या अडचणीत धावून जाण्याचे भान हीच नाळ सतत देत राहते. साठ वर्षांपूर्वी नोकरी आणि इतर कारणांमुळे गाव सोडलेल्या दिगंबर विनायक इनामदार यांनी पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन दहा हजार रुपयांची मदत केली.

दिगंबर इनामदार यांचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव व बांबवडे हे गाव आहे. 1960 च्या दशकात दिगंबर इनामदार यांच्या परिवाराने गाव सोडले. रेल्वे विभागातील नोकरीनिमित्त ते मध्यप्रदेश मधील रतलाम येथे स्थायिक झाले. समाजसेवा करण्याची सवय सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे ते रेल्वे पेन्शनर लोकांसाठी काम करत आहेत. रेल्वेतील कर्मचा-यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळवून देण्यासाठी ते सक्रिय काम करत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली आणि पुराने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले. इनामदार कुटुंब मध्य प्रदेशात स्थायिक झाले असले तरी गावाशी जोडलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. पुरामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन आणि आपल्या गावाची झालेली दुर्दशा यामुळे इनामदार यांनी आपल्या गावक-यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दहा हजार रुपयांची मदत करून आपल्या मातीशी असेलेले नाते आणखी घट्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.