Pimpri: मिळकत कर सवलत योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

Income tax relief scheme extended till 31st July

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता आला नाही. तसेच मिळकत कर सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही. महापालिकेचे आर्थिक चक्रही बिघडले आहे.  त्यामुळे महापालिकेने सामान्य करातील सवलत योजनेला 31 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

महापालिकेमार्फत 30 जून पूर्वी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण मिळकत कर बिलांची रक्कम आगाऊ भरणा करणा-या मालमत्ताधारकांना कर सवलत दिली जाते. माजी सैनिकांचे नावे असलेल्या मालमत्ता, फक्त महिलांच्या नावे असलेल्या मालमत्ता, 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या नि:समर्थ मालमत्ताधारकाच्या मालमत्तांना सामान्य कराच्या चालू मागणीत 5 ते 50 टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते.

कोविड 19 चा प्रादुर्भाव असल्याने मालमत्ताधारकांना  या कालावधीत सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही. या मालमत्ताधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेला 30 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय जे मालमत्ताधारक थकबाकीसह (अवैध बांधकाम शास्तीकराची रक्कम वगळून) संपूर्ण मालमत्ताकराची एक रक्कमी 100 टक्के भरणा करतील. त्यांना आकारण्यात आलेल्या महापालिका विलंब दंड रकमेच्या 90 टक्के सवलतीच्या अभय योजनेसही 31 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागरिकांना महापालिकेच्या 16 विभागीय कार्यालयामध्ये रोख, धनादेश, डीडीद्वारे मालमत्ता कराचा भरणा करता येईल. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नागरिकांनी 31 जुलै पूर्वी एक रकमी मालमत्ताकराचा भरणा करुन सामान्य करातील विविध सवलत योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.