Pimpri : भालदार समाजाचा भटक्या जमातीच्या यादीत समावेश करा

भालदार समाजाची मागणी

एमपीसी न्यूज – भालदार समाजाचा भटक्या जमातीच्या यादीत समावेश करावा. यामुळे भालदार समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल. अशी मागणी भालदार जमातीचे प्रदेश अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक बसवराज पाटील, लातूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना दिले. पिंपरी चिंचवड व्हीजेएनटी सेलच्या अध्यक्षा निर्मला माने, राज्याच्या उपाध्यक्ष शकुंतला भाट आदी यावेळी उपस्थित होत्या.

राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भालदार समाज पूर्वी राजाच्या दरबारात सेवकांचे काम करत होता. काही राजांनी या समाजातील सेवकांना किरकोळ जमिनी दिल्या. मात्र, 1955 साली किरकोळ वतने नष्टीकरण कायद्याने त्यांची ही वतने नष्ट झाली. त्यामुळे या समाजावर आर्थिक संकटाची कु-हाड कोसळली. समाजातील अनेक कुटुंबे गावोगाव भाकरीच्या शोधात निघून गेली. दरम्यान, गुलामअली भालदार यांनी 1993 ते 1996 या कालावधीत समाजातील लोकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती जमा केली.

जमा केलेल्या माहितीच्या आधारे राज्य मागासवर्ग आयोगाकडे भालदार समाजाला इतर मागासवर्गाच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली. आयोगाच्या अधिका-यांनी 1996 साली पिंपरी, चिंचवड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील भालदार समाजातील नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या. आजही भालदार समाज आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे. भालदार समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येत आहेत. त्यामुळे भालदार समाजाचा भटक्या जमातीच्या यादीत समावेश करावा. ज्यामुळे समाजाला योग्य न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.