Pimpri: ‘वायसीएमएच’ मधील निवासी सीपीएस डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

Pimpri: Increase in stipend for resident CPS doctors in YCMH

एमपीसी न्यूज- कोरोना विरोधात लढणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 25 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. या डॉक्टरांना आता 50 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे. रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टर चोवीस तास प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत. या 33 डॉक्टरांना ऑगस्ट 2018 पासून 24 हजार 800 रुपये विद्यावेतन मिळत होते.

सध्या कोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती आहे. तरीही, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.

या डॉक्टरांनी सातत्याने विद्यावेतन वाढ करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन देखील केले. डॉक्टरांच्या आंदोलनानंतर प्रशासन जागे झाले.

पदाधिका-यांसोबत चर्चा केली. कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते. तेवढेच वेतन सीपीएस डॉक्टरांना देण्याच्या सूचना पदाधिका-यांनी केल्या. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सीपीएस डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली.

या डॉक्टरांना एप्रिलपासून 50 हजार 112 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.