Pimpri : वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ; चोरट्यांचा महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकलवरही डोळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा यांसारख्या महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कार चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. रस्त्याच्या बाजूला, घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेली वाहने चोरटे चोरून नेत आहेत.

चाकण आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन वाहने चोरीला गेली आहेत. तर, तळेगावमधून एक मोटारसायकल आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहनांतील साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.

  • निगडी पोलीस ठाण्यात नेल्वीन पारमट्टम वर्गीस (वय 44, रा. प्राधिकरण निगडी) यांनी त्यांची फाॅर्च्यूनर कार चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि . 8) रात्री त्यानी त्यांची फाॅर्च्यूनर कार (एमएच 14 / डीएफ 5810) सेक्टर नंबर 26 येथे रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 12 लाख रुपये किमतीची कार चोरून नेली.

चिकन चौक ते त्रिवेणी नगर चौक दरम्यान सर्विस रोडलगत पार्क केलेला सहा लाख रुपये किमतीचा एक डंपर (एमएच 12 / ईएफ 5457) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी नारायण गुणाजी तांबवे (वय 55, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • चाकण पोलीस ठाण्यात शरद सीताराम बर्वे (वय 33, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली. शरद यांची इनोव्हा कार (एमएच 12 / एच झेड 7891) शनिवारी (दि. 6) दुपारी साडेपाचच्या सुमारास बिघडली. त्यामुळे त्यांनी कार पुणे-नाशिक रोडवर हॉटेल महादेव समोर रस्त्याच्या बाजूला कार पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीची कार चोरून नेली. रविवारी (दि. 7) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

प्रमोद बाळासाहेब कड (वय 31, रा. संतोष नगर, भाम वाकी बु, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटारसायकल (एम एच 14 / बी डब्ल्यू 1951) त्यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 9) दुपारी पार्क केली. अज्ञात चोरट्याने भर दिवसा दुचाकी चोरून नेली.

  • तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण नवगुने (वय 32, रा. साईनगर, गहुंजे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

बोराडेवाडी रोडजवळ वाघेश्वर येथे राजकुमार हरिप्रसाद गुप्ता (वय 55, रा. मोशी) यांची कार पार्क केली होती. बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी कार टेप आणि स्टेपनी चोरून नेली. तसेच कारची काच फोडून नुकसान केले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.