Pimpri: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदी प्रकरणी लेखापाल, कारकूनाची वेतनवाढ रोखली

एमपीसी न्यूज – आषाढी पालखी सोहळ्यातील दींडीप्रमुखांना भेट देण्यात आलेल्या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागातील लेखापाल आणि कारकूनाची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखून ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

लेखापाल प्रविणकुमार शिवराम देठे आणि कारकून भगवंता धोंडीबा दाभाडे अशी वेतनवाढ रोखलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळ्यातील दींडीप्रमुखांना सन 2016 मध्ये विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती भेट देण्यात आली होती. या मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत महापालिकेकडे तक्रारही करण्यात आली होती.

  • या तक्रारीच्या अनुषंगाने द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, संबंधित विभागातील लेखापाल प्रविणकुमार देठे आणि भगवंता दाभाडे यांची 11 नोव्हेंबर 2016 रोजी विभागिय चौकशी सुरू करण्यात आली होती. 7 एप्रिल 2018 रोजी दोघांच्याही खातेनिहाय चौकशीचा अहवाल प्राप्त झाला.

या चौकशीत देठे आणि दाभाडे यांच्यावर ठेवलेले दोषारोप शाबीत झाले. मात्र, देठे आणि दाभाडे यांनी आपल्यावर ठेवलेले दोषारोप अमान्य केले. मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहायक आयुक्तांनी 2 जानेवारी 2019 रोजी आपला अभिप्राय सादर केला. त्यामध्ये मूर्ती खरेदीप्रकरणात अनियमितता झाली असली तरी पुरवठाधारकाच्या बीलाची पुर्तता होऊन प्रकरणाचा निपटारा झाला आहे. यात महापालिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे देठे आणि दाभाडे यांचे कर्तव्य आणि जबाबदा-या विचारात घेऊन त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याबाबत अहवालात नमुद केले.

  • विभागप्रमुखांचा अहवाल, खातेनिहाय चौकशीत शाबीत झालेले दोषारोप विचारात घेता देठे आणि दाभाडे यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नियमातील तरतुदीनुसार, देठे आणि दाभाडे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही,  अशा रितीने तात्पुरत्या स्वरूपात रोखून ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. तसेच यापुढे कोणत्याही स्वरूपाच्या कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.