Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका चारचाकीसह पाच दुचाकी अशी तीन लाखांची वाहने चोरून नेली आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी रविवारी (दि. 5) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहनचोरीचा पहिला प्रकार पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. 31) सायंकाळी सहा ते बुधवारी (दि. 1) सकाळी दहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी विष्णू व्यंकट लोखंडे (वय 34, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोखंडे यांनी त्यांची 25 हजारांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या समोर सार्वजनिक रस्त्याच्या कडेला लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीचा दुसरा प्रकार रुपीनगर, तळवडे येथे मंगळवारी (दि. 31) घडला. याप्रकरणी सरफराजअलम शाहीद शेख (वय 36, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांचे मित्र हनुमंत विठ्ठल शेडगे यांची दुचाकी लॉक करून पार्क केली होती. 30 हजार रुपये किमतीची ती दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीचा तिसरा प्रकार तळेगाव-चाकण रस्ता, तळेगाव स्टेशन येथे शनिवारी (दि. 4) रात्री घडला. याप्रकरणी सम्राट अशोक बो-हाडे (वय 27, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली होती. बनावट चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीचा चौथा प्रकार चिखली येथील सोनवणे वस्ती येथे गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा ते शुक्रवारी (दि. 3) सकाळी नऊच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रत्नाराम जिवाराम देवासी (वय 32, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची व प्रेमसिंग लहरसिंग रजपूत (वय 28) यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केल्या होत्या. 30 हजार रुपये किमतीच्या या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

लॉक करून पार्क केलेली चारचाकी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून चोरून नेली. केशवनगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 4) रात्री 10 ते रविवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी भास्कर शंकर थोरे (वय 47, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी थोरे यांनी त्यांची एक लाख 90 हजार रुपये किमतीची चारचाकी ऑफिसमोर रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी डुप्लीकेट चावीचा वापर करून चारचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.