Pimpri: महापालिकेत वाढीव निविदा; आता काळेबेरे दिसल्यास सोडणार नाही -अजित पवार

महापालिकेला सक्षम आयुक्त देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांच्या नावाखाली अनेक वाढीव निविदा काढल्या आहेत. आता काळेबेरे दिसल्यास फिकिर करणार नाही. आता ‘आपले सरकार’ असून वाढीव कामांची, आजपर्यंतच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असा गर्भित इशारा देत महापालिकेतील सत्ताधारी भाजप आमदारांनी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे अशी वाटणी करुन घेतल्याचा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे. टँकर माफियांच्या स्वार्थासाठी पाणीकपात केली आहे का? याची चौकशी करण्यात येईल. महापालिकेला सक्षम आयुक्त देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजित पवार आज (शनिवारी) पहिल्यांदाच शहरात आले होते. आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, हनुमंत गावडे, योगेश बहल, दत्ता साने, मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, मयूर कलाटे आदी उरस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, अनेकांनी अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याच्या वल्गना केल्या. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली. पण, प्रश्न सुटले नाहीत. महापालिकेतील सत्ताधारी भाजप शहरवासीयांना पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत. पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, नागरिकांना पाणी मिळत नाही. भाजपवाले आजही आमच्या नावाने शंख फोडत आहेत. कच-याचा प्रश्न गहन झाला आहे. शहरातील रस्त्यांची खोदाई करुन ठेवली आहे. शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गाड्यांची तोडफोड केली जात आहे.

शहरातील गुंडगिरी थांबविणार आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाईल. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.