Pimpri: ‘ऑन ड्युडी’ डुलक्या घेणा-या पाणीपुरवठा विभागातील मजुरांची वेतनवाढ रोखली

एमपीसी न्यूज – मोरेवस्ती, चिखली, त्रिवेणीनगर, मोहनगरमधील पाण्याची टाकी भरुन घेण्याची जबाबदारी असताना रात्रीच्या वेळी ‘ऑन ड्युडी’ डुलक्या घेणा-या पाणीपुरवठा विभागातील मजुरांवर आयुक्तांनी कारवाई केली आहे. त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

राजेंद्र बाळू मोरे, रवींद्र बाबुराव अहिरराव आणि आबाजी सीताराम कातोरे यांची एक वेतनाढ रोखण्यात आली आहे. हे तिघेही ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात मजूर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाअंतर्गत मोरेवस्ती, चिखली, त्रिवेणीनगर, मोहननगरमधील उंच टाकी भरुन घेण्याचे आणि दिलेल्या वेळी टाक्यांचे व्हॉल्व्ह चालू-बंद करण्याचे कामकाज आहे. कामाच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी तिघेही झोपल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांना पाणीपुरवठा अपु-या दाबाने झाला.

याबाबत मोरे, अहिरराव आणि कातोरे यांना तोंडी, लेखी सूचना आणि नोटीसा बजावून देखील त्यांच्या गैरवर्तनात सुधारणा झाली नाही. पाणीपुरवठा विषयक कामात अडथळा निर्माण झाला. खातेनिहाय चौकशीत त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याने मोरे, अहिरराव आणि कातोरे यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.