Pimpri : दुष्काळाच्या सावटाखाली जगतोय जगाचा पोशिंदा !

एमपीसी न्यूज – यावर्षी सर्वत्रच पाऊस कमी पडल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचे सावट पसरले आहे. अनेक गाव खेड्यांमध्ये पावसाळ्यातच टँकर सुरु झाले आहेत. उभ्या पिकांनी पाणी-पाणी करून माना टाकल्या आहेत. कापसाने जिवंत राहण्यासाठी बोंडेच धरली नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात पायपीट करण्यास सुरुवात झाली आहे. येणारे आठ महिने अतिशय खडतर आहेत. स्वतःच्या जगण्याची भ्रांत पडली असून त्यात जनावरांना चारा आणि पाणी कुठून आणायचे यामुळे जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून केवळ उन्हाळ्यापुरते नियोजन न करता शासनाने हिवाळा आणि उन्हाळा या आठ महिन्यांचे नियोजन करायला हवे.

महाराष्ट्र राज्यात सरकारी पावसाळा 7 जून ते 15 ऑक्टोबर एवढा असतो. आता सरकारी पावसाळा संपला आहे. राज्यभरात यावर्षी सरासरीच्या तुलनेत एकूण 75 टक्के पाऊस पडला आहे. नागपूर विभागात सरासरीच्या 79.8 टक्के, पुणे विभागात 78.7 टक्के तर अमरावती विभागात 77.7 टक्के पर्जन्यवृष्टी झाली आहे. मागील पंधरा ते वीस वर्षांमधील हा सर्वात कमी पाऊस आहे. परतीच्या पावसाची आस लावून बसलेल्या बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाचे संकट उभारले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणी पोहोचवले जात असून सोलापूर जिल्ह्यात केवळ 38 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला. त्यामुळे धरणात काही प्रमाणात पाणी साचले. पण पावसाळ्याच्या शेवटपर्यंत काही धरणे आटून गेली तर काही धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे आदेश काढावे लागले आहेत. शेतीला पाणी नसल्यामुळे उभ्या पिकात जनावरे बांधावी लागत आहेत. शेतक-यांनी त्यांचे प्राणीप्रेम दाखवून पिके तर घालवली. पण पुढच्या आठ महिन्यांची चिंता त्याच्या डोक्यावर घोंघावत आहेच. पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणा-या पिकांचा खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून निसटला आहे. रब्बी हंगामही असाच कोरडा जाणार आहे.

तूर, उडीद, हुलगे, तांदूळ, कापूस राज्यातील बहुतांश भागात मान टाकून डोलत आहेत. दिवाळीच्या सुमारास तुरीच्या हिरव्या शेंगा खाण्यासाठी मुलांची झुंबड उडत असते. परंतु पाऊस नसल्याने जिवंत राहण्यासाठी तग धरलेल्या तुरीला साधा फुलोरा देखील लागला नाही. चार-चार फूट उंच वाढणारा कापूस दीड-दोन फुटांवर तग धरून उभा आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीकामासाठी मजूर लावायला पैसे नसल्याने लहान मुलांसह सर्वजण शेतात दिवसरात्र राबत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला राज्यभरात पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे सर्व भागात पेरण्या वेळेवर उरकल्या. पिकांची उगवण चांगली झाली. सगळं शिवार हिरवं झालं. पिके ऐन जोमात येताच पावसाने दडी मारली. सर्वच पिकांची जिवंत राहण्यासाठी सध्या तगमग सुरु आहे.

राज्यातील काही धरणे कोरडी, तर काही धरणे तळाला गेली आहेत. मोजकीच धरणे आहेत, ज्यांच्यामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातून राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट कसे सावरणार हा मोठा प्रश्न सध्या बळीराजासह सर्व नागरिकांसमोर उभा आहे. या संकटात पहिली झळ शेतक-यांना बसणार आहे. सर्व जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी संकटात येऊन चालणार नाही. मग तो विदर्भातील कापूस पिकवणारा असो अथवा कोकणातील हापूस पिकवणारा, पोशिंदा जगला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.