Pimpri : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळच्या इंद्रायणी तांदळाची ‘बर्थडे गिफ्ट’!

एमपीसी न्यूज – वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळचा इंद्रायणी तांदूळ भेट म्हणून देण्यात आला.

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख भूषण जगताप यांच्याकडून वाढदिवसाच्या हटके पद्धतीने शुभेच्या देण्यात आल्या. पाच किलो तांदुळाच्या कापडी पिशवीवर मावळचा इंद्रायणी तांदूळ असे लिहून मंत्री महोदयांना तांदूळ भेट म्हणून देण्यात आले. आवडीचा असलेला इंद्रायणी तांदूळ एकनाथ शिंदेनी स्वीकारून तो घरी देण्यास सांगितले.

याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख भूषण जगताप यांच्यासह कक्षप्रमुख मंगेश चिवटे व इतर मान्यवर उपस्थित होते. भूषण जगताप यांनी पारंपरिक बुकेची पद्धत मोडीत काढत शेतात पिकवलेला इंद्रायणी तांदूळ भेट देऊन नवीन परंपरा सुरु केली. आपल्या भागातील तांदूळ प्रसिद्ध करायचा असेल तर मावळवासियांनी अश्याच पद्धतीने शुभेच्छा द्यायला सुरुवात केली पाहिजे, असे मत जगताप यांनी यावेळी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.