Pimpri: इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आवश्यक ते करावेच लागेल -शरद पवार यांचे अधिका-यांना निर्देश

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदी स्वच्छ, पवित्र, शुद्ध राहिली पाहिजे. नदीमध्ये रसायनमिश्रीत पाणी जाता कामा नये. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहे, ते करावेच लागेल. त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अधिका-यांना केल्या आहेत.

चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियानासंदर्भात साखर संकुल, पुणे येथे पवार यांनी आज (मंगळवारी) बैठक घेतली.

यावेळी बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह आळंदीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शनिवारी शरद पवार आळंदीत आले होते. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी वारक-यांनी केली होती. लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार पवार यांनी आज तत्काळ अधिका-यांची बैठक घेतली. विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी नद्या प्रदूषित होण्याची कारणमीमांसा सांगितली. त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचे सादरीकरण केले. इंद्रायणी व इतर नद्यांच्या काठांवर असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधून नद्यांमध्ये येणारे प्रदूषित पाणी व कचरा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे जल प्रदूषणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने चालू असलेल्या कामांची माहिती दिली.

चिखलीत अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमधून रसायनमिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. या कारखान्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करणे आवश्यक आहे. च-होलीत सांडपाणी प्रकल्प आहे. त्याची क्षमता कमी आहे. ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नदीच्या कडेच्या ग्रीन पट्ट्यात झाडे लावण्यात येतील. नदीचे सुशोभीकरण करता येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरणात सांगितले.

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आवश्यक आहे. ते करावे लागेल. इंद्रायणी स्वच्छ, पवित्र राहिली पाहिजे. इंद्रायणी जेवढी स्वच्छ ठेवता येईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागणारच आहेत. त्यादृष्टीने कारवाई करावी. राज्याचे मुख्य सचिवांसोबत यासंदर्भात मुंबईत बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.