Pimpri: महापालिकेच्या विकासकामांची माहिती आता मिळणार ‘सोशल मीडियावर’; सोशल मीडिया सेलची स्थापना

प्रत्येक विभागाचा स्वतंत्र प्रवक्ता; 20 अधिकारी, कर्मचा-यांकडे प्रवक्तेपदाची धुरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात केलेल्या विकासकामांची आणि सुरु असलेल्या विकासकामांची माहिती शहरवासियांना आता ‘सोशल मीडियावर’ मिळणार आहे. महापालिका सर्व विभागांमार्फत शहरात सुरु असलेल्या कामांची माहिती विविध सोशल मीडियाच्या ‘प्लॅटफॉर्मवर’ प्रसिद्ध करणार आहे. नागरिकापर्यंत कामे पोहचवावीत, या उद्देशाने सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रवक्ता नेमण्यात आला आहे. 20 अधिकारी, कर्मचा-यांकडे प्रवक्तेपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

महापालिकेतील विविध कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करून नागरिकांना तातडीने उपलब्ध होईल. या दृष्टीने कामकाज करण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेतील शहर परिवर्तन विभागाबरोबरच अन्य प्रशासकीय कामकाजासाठी विविध एकूण 20 अधिकारी आणि कर्मचा-यांची विभागाच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. या सर्व विभागांची माहिती अधिकृतपणे उपलब्ध करुन देणे, असे या प्रवक्‍त्याचे काम असणार आहे.

  • या सोशल मीडिया सेलमध्ये शहर परिवर्तन कार्यालयाची भूमिका अन्य विभागांच्या तुलनेत अधिक महत्त्वाची ठेवण्यात आली आहे. सर्व विभागांकडून प्राप्त झालेली माहिती, आगामी कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी उपलब्ध होणा-या माहितीची छाननी करणे, मजकूर अंतिम झाल्यानंतर तो प्रमाणित करुन विविध सोशल मीडिया ‘प्लॅटफॉर्मवर’ प्रसिद्ध करण्याची जबाबदारी या कार्यालयावर सोपविण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि टेक -9 सर्व्हिस विभागाकडे शहर परिवर्तन कार्यालयाकडून आलेल्या माहितीचे पोस्ट डिझाईन करुन ते शहर परिवर्तन कार्यालयाला परत पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक विभागाला आवश्‍यक असलेल्या तांत्रिक सहकार्याची जबाबदारी देखील माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

  • पालिकेतील सर्व विभागांनी आपली माहिती जनसंपर्क विभागाकडे सोपवायची आहे. सोशल मीडिया सेलमध्ये सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे, लिपिक खुशाल पुरंदरे व अंकुश कदम तसेच शहर परिवर्तन कार्यालयातील सेबेस्टीयन सोनी व किरण पंडित तसेच कॉम्प्युटर प्रोग्रॅमर उज्वला गोडसे आणि सुधीर बो-हाडे यांचा समावेश असणार आहे.

या सेलची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी इलेक्‍शन ड्युटीवर असल्याने या सेलची प्राथमिक बैठक होऊ शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर याच आठवड्यात या सेलची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या संयुक्‍त बैठकीत शहर परिवर्तन कार्यालय व नियुक्‍त केलेल्या प्रवक्‍त्यांची जबाबदारी समजावून दिली जाणार आहे.

  • प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती झालेले अधिकारी, कर्मचा-यांचे नाव :
    1) शिरिष पोरेड्डी – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), 2) शशिकांत मोरे- कार्यकारी अभियंता (विद्युत),3) रामदास तांबे- सहशहर अभियंता (पाणीपुरवठा), 4) दिलिप आढारी -प्रशासन अधिकारी (मिळकत कर), 5) अनिता कोटलवार – माहिती व तंत्रज्ञान अधिकारी ( माहिती व तंत्रज्ञान), 6) लक्ष्मीकांत कोल्हे – उपअभियंता ( स्मार्ट सिटी), 7) दत्तात्रय गायकवाड -उद्यान अधीक्षक ( उद्यान), 8) रज्जाक पानसरे- क्रीडा अधिकारी (क्रीडा), 9) गणेश देशपांडे -सहाय्यक आरोग्य अधिकारी ( आरोग्य व स्वच्छ भारत अभियान), 11) डॉ. वर्षा डांगे वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय), 12) संभाजी ऐवले- समाज विकास अधिकारी (नागरवस्ती), 13) विजय भोजने -उपअभियंता (बीआरटीएस) 14) संजय कुलकर्णी- कार्यकारी अभियंता ( पर्यावरण), 15) आण्णा बोदडे- क्षेत्रीय अधिकारी (माहिती व जनसंपर्क), 16) किरण गावडे -अग्निशमन अधिकारी (अग्निशामक), 17) प्रशांत झनकर – लेखाधिकारी (लेखा), 18) प्रशांत शिंपी- नगररचनाकार (नगररचना) 19) सतिश इंगळे- कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) आणि प्रांजल इंगळे -लिपिक ( आयुक्‍त कक्ष).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.