Pimpri : शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी नव्याने तपासाचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आदेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काहींना अटक केली. याप्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिले आहेत. तसेच हा तपास एससी प्रवर्गातील पोलीस अधिक्षाकांच्या वरील दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पिंपरी कॅम्प परिसरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली. दोन्ही गटांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काही लोकांना अटक केली. यामध्ये भाजप पदाधिकारी धर्मेंद्र सोनकर आणि राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हिरानंद आसवानी यांच्यासह आणखी काही जणांना अटक झाली. अटक झालेल्या कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

याबाबत धर्मेंद्र सोनकर यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली. पोलिसांनी राजकीय दबावातून सोनकर यांच्याविरोधात कारवाई केल्याचे तक्रारीत म्हटले. विरोधकांकडून खुनी हल्ला झाला. पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलावले आणि अटक केली असल्याचेही देखील सोनकर यांनी दिलेल्या तक्ररीत म्हटले आहे.

यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडे या प्रकरणाचा अहवाल मागितला. पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालात अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे आयोगाने तक्रारदार सोनकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा पुन्हा एकदा नव्याने तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. धर्मेंद्र सोनकर आणि अन्य लोकांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा मागे घेण्यास सांगितले आहे.

संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. याबाबत ‘ऍक्शन टेकन रिपोर्ट’ पंधरा दिवसांत सादर करण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. हा आदेश आयोगाचे सदस्य डॉ. स्वराज विद्वान यांनी दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ जानेवारी 2020 रोजी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.