Pimpri: नगरसेवकांच्या आरोग्य विम्याला एक वर्षाची मुदतवाढ

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेने 125 नगरसेवकांसह त्यांच्या कुटुबीयांसाठी उतरविलेल्या आरोग्य विमा योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. नगरसेवकांचा वार्षिक पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून पुढील एका वर्षासाठी येणाऱ्या 49 लाख 24 हजार रुपयांच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांची संख्या 128 असून 5 स्वीकृत सदस्यांसह एकूण 133 नगरसेवक आहेत. यापैकी 125 नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारली आहे. तर, आठ नगरसेवकांनी सवलत स्वीकारली नव्हती. 125 नगरसेवकांना त्यांच्यासह कुटूंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू केली आहे. नगरसेवक पती-पत्नी आणि त्यांच्या 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी विमा योजना लागू आहे.

विमा योजनेची एक वर्षाची मुदत 18 डिसेंबर 2019 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आरोग्य विमा योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मार्श इंडिया इन्शूरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करारनामा करण्यात येणार आहे. त्यासाठी 49 लाख 24 हजार 730 रुपये खर्च येणार आहे. इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीमार्फत विमा उतरविण्यात येणार आहे. यासाठी येणा-या खर्चातील 75 टक्के रक्कम डिसेंबर 2019 आणि 25 टक्के रक्कम 31 मार्च 2020 पर्यंत अदा करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.