Pimpri: विमा पॉलिसी!; कर्मचारी महासंघाची आयुक्तांना नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांसाठी असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करुन नवीन विमा पॉलिसी आणण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. विमा पॉलिसीत अनेक त्रुटी, संभ्रम आहे. त्यामुळे जोपर्यंत संभ्रम दूर होत नाही. तोपर्यंत विमा पॉलिसी लागू करु नये, अशी मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे. विमा पॉलिसीला महासंघाची मान्यता असणार नाही. हे पत्र दिवाणी न्याय प्रक्रिया कलम 80 (क) नुसार नोटीस समजावी, असेही महासंघाने म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अबंर चिंचवडे आणि महासचिव सुप्रिया सुरगुडे-जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. महापालिकेतील कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना सुरु आहे. ही योजना बंद करुन त्रयस्थामार्फत नवीन विमा पॉलिसी आणण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही चालू असल्याचे समजते.

_MPC_DIR_MPU_II

कर्मचा-यांसाठी कोणतेही धोरण ठरवताना कर्मचा-यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने कर्मचारी महासंघाला नवीन विमा पॉलिसीबाबत रविवारी (दि.3) व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सादरीकरण दाखविण्यात आले.

सादरीकरणावेळी महासंघाच्या प्रतिनीधींनी नवीन पॉलिसी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली नाहीत. खासगी कंपनीच्या प्रतिनीधींना समर्पक उत्तरे देता आली नाही. सादरीकरणावेळी अनेक त्रुटी, संदिग्धता आढळून आली. हा प्रश्न कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा हजारो लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. यामुळे महासंघाला आणि सर्व कर्मचा-यांना त्याबाबत अधिक स्पष्टता असणे आवश्यक आहे. परंतु, दुर्दैवाने असा कोणताही प्रकार याबाबत दिसून येत नाही.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निवडून येणा-या कर्मचारी महासंघासोबत चर्चा करुनच निर्णय घेण्याचे निर्देश आपणास दिले आहेत. यामुळे जोपर्यंत सर्व कर्मचा-यांना विश्वासात घेऊन नवीन योजनेबाबत असलेले सर्व संभ्रम दूर केले जात नाहीत. तोपर्यंत ही योजना लागू करण्यात येवू नये. त्यास कर्मचारी महासंघाची मान्यता असणार नाही. हे पत्र दिवाणी न्याय प्रक्रिया कलम 80 (क) नुसार नोटीस समजावी, असेही महासंघाने म्हटले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.