BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कौतुकास्पद! ईद साजरी न करता पूरग्रस्तांसाठी दिले जीवनावश्यक साहित्य

आमचा देव यामध्येच खूश होईल; अरिफ मुजावर यांची भावना

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या आपत्तीमुळे भोसरीतील मुस्लिम बांधव अरिफ मुजावर यांनी बकरी ईद साजरी न करता पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुजावर यांनी मदत केली असून त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमचा देव यामध्येच खूश होईल, अशी भावना मुजावर यांनी व्यक्त केली.

पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधव अरिफ मुजावर यांनी आज (सोमवारी) बकरी ईद साजरी केली नाही. सनावरील खर्चाऐवजी त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य दिले. मुजावर आळंदी रोड भोसरी येथे राहत असून एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी आजचा बकरी-ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

  • याबाबत बोलताना मुजावर म्हणाले, ”कोल्हापूर, सांगली भागातील बांधवांवर मोठे संकट आले आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपले बांधव संकटात असताना सन साजरा करणे योग्य नाही. हे संकट मोठे आहे. सन पुढच्या वर्षी देखील येईल. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत केली असून आमचा देव यामध्येच खूश होईल. गहू, तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, साखर अशा खाद्यपदार्थ दिले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एक हात मदतीचा’ हा चांगला उपक्रम राबविला आहे. त्यांच्यामार्फत आम्हाला पूरग्रस्तांना मदत पोहचविता आली”.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘बकरी-ईद साजरा न करता संकटातील बांधवांना मदत करुन अरिफ मुजावर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे’.

  • पूरग्रस्तांसाठी मंगळवारी भोसरीतून जीवनावश्यक साहित्याचे आणखीन 30 टेम्पो होणार रवाना!
    पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला भोसरी परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मदतीचा महापूर आला आहे. आजपर्यंत जीवनावश्यक साहित्याच्या 15 गाड्या सांगली, कोल्हापूरला पाठविल्या असून उद्या (मंगळवारी) 30 गाड्या भरुन साहित्य पाठविले जाणार आहे. त्यामध्ये किराणा माल, कपडे, शुद्ध पाणी, बिस्किटे, अन्नधान्य, औषधे, जनावरांची औषध, चारा, पॅक करुन पाठविले जात आहे.

सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, भिलवडी, ऐतवडे, तांबवे, अंकलखोप दोन गाड्या, बुरली एक, बोरगाव एक, पुनदी एक, रेठरेहरनांश, अमनापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हासूर, शिरटी, उदगाव, येथे तीन अशा 15 गाड्या भरुन जीवनावश्यक साहित्य पाठविले आहे. मंगळवारी आणखीन 30 गाड्या भरुन जीवनावश्यक साहित्य पाठविले जाणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तसेच आता पूरपरिस्थिती निवळत आली असल्याने साथीचे आजार पसरण्याची भिती आहे. त्यासाठी उद्यापासून रुग्णवाहिकेसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठविण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3