Pimpri : नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंधांतून गुन्हेगारीचा बिमोड करणार – पद्मनाभन

(मुलाखत / श्रीपाद शिंदे)

दांडगा अनुभव आणि कुल नेचर असलेले पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांचा विशेष मुलाखत. नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवून गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असण्याची गरज आणि मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी होत होती. त्यावर अंमलबजावणी करत 15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे शहर आणि पुणे ग्रामीणचे विभाजन करत पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. शहराला अप्पर महासंचालक दर्जाचे पोलीस आयुक्त मिळाले. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बसू लागले. आयुक्तालयासाठी सुरुवातीला संख्याबळ कमी असले तरी अधिकारी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा राबता शहरात वाढू लागला. याचा परिणाम सरळपणे शहरातील गुन्हेगारीवर झाला.

नवीन पोलीस आयुक्तालयापुढे अनेक आव्हाने होती किंबहुना अजूनही आहेत. शहरात आयटी पार्क, झोपडपट्टी, औद्योगिक वसाहत असा त्रिशंकू आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सांभाळताना, त्यात कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर आयुक्तालयापुढे दिवसागणिक नवीन आव्हाने येत आहेत. प्रलंबित नियुक्त्या, नियुक्त्यांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम, आयुक्तालयाच्या इमारतीसाठी लागणारा वेळ, मनुष्यबळाची कमतरता, वाहनांची कमतरता, वाढती गुन्हेगारी, स्मार्ट पोलिसिंगचा अभाव असे अनेक आव्हानांचे डोंगर पार करत आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पहिल्याच वर्षात आयुक्तालयाची घडी सुरळीत बसवली आहे. काही त्रुटी आहेत. काही बाबींमध्ये पोलीस कमी पडत आहेत. पण आयुक्तालयाने गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले आहे.

प्रश्न : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पहिले आयुक्त आणि पहिले वर्ष, काय अनुभव होता?
उत्तर : पिंपरी-चिंचवड शहराचा पहिला आयुक्त म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आयुक्त पहिलाच असलो तरी माझा अनुभव जुना आहे. शहरात पहिला आयुक्त म्हणून काम करत असताना जबाबदारी खूप मोठी होती. कारण आत्ता बसवलेली घडी इथून पुढे कायमस्वरूपी असणार आहे. शहराचा अभ्यास आणि माहिती घेऊन नियोजनपूर्वक काम करत आहे. कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षा नेहमीच सर्वोच्च स्थानी आहे. सुरवातीला काही अडचणी आणि समस्या निर्माण होणे स्वाभाविक होते. मात्र त्याचा विचार न करता आहे त्या परिस्थितीत काम सुरु करून नागरिकांना पोलिसांची भीती न वाटता आदर आणि आधार वाटावा याच दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करत आहे.

प्रश्न : आयुक्तालय शून्यातून उभे करताना काय अडचणी होत्या?
उत्तर : एखादी गोष्ट नव्याने सुरु करत असताना अडचणी आणि समस्या येणारच. मात्र त्याबद्दल विचार न करता काम करत राहणे हाच उपाय आहे. आयुक्तालयासाठी इमारत उभी करण्यापासून ते शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत अडचणी होत्या. पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर महापालिकेने सहकार्य केले आणि प्रेमलोक पार्क येथे आयुक्तालयाची स्वतंत्र इमारत तयार झाली. त्यानंतर आयुक्तालयाला मंजूर मनुष्यबळ मिळाले नव्हते. अजूनही मनुष्यबळाची कमतरता आहे. आवश्यक मनुष्यबळ मिळवण्यासाठी प्रयत्न आजही सुरु आहेत. वाहनांची समस्या होती. पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून काही वाहने तर काही कंपन्यांकडून काही वाहने मिळवून काम सुरु आहे. काही पथकांची निर्मिती अजूनही करण्यात आलेली नाही. त्यासाठी संसाधनांची उपलब्धता होताच पथकांचीही स्थापना होईल.

प्रश्न : शहरात वाढत असणारी गुन्हेगारी थोपण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत?
उत्तर : शहराचा विचार करता एकीकडे आयटी पार्क तर दुसरीकडे एमआयडीसी. एकीकडे हिंजवडी, वाकड प्राधिकरण सारख्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती तर गांधीनगर, ओटास्किम सारखा झोपडपट्टी परिसर आहे. यामुळे गुन्हेगारीचे स्वरूप वेगवगेळे आहे. तोडफोड, हाणामारी असे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना पोलिसांचे अस्तित्व दिसणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांमध्येही पोलीस आपल्या सोबत आणि सुरक्षेसाठी सज्ज आहे. ही भावना निर्माण होणे महत्वाचे आहे. तसेच अनेकवेळा गुहेगार हे पोलिसांपेक्षा फिट असल्याचे दिसते यामुळे पोलीस तितकेच फिट असणे महत्वाचे आहे. संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसिंग वाढवण्यावर भर असणार आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या कुरापती थांबवण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. मागील वर्षभरात गुन्हेगारी कमी झाली आहे.

प्रश्न : शहरात वाहतूक, अवैध वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे? याबाबत काय उपाययोजना केल्या?
उत्तर: शहरातील ट्राफिकचा प्रश्न जाणून घेण्यासाठी मी स्वतः गाडी घेऊन शहरातून फिरलो आहे. हिंजवडी भागातील ट्राफिक अनुभवले आहे. ट्राफिक प्रश्न माझ्या दृष्टीने हिटलिस्टवर असून तो सोडवण्यासाठी अनेक संकल्पना राबवित आहोत. अवैध वाहतूकदारांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांमुळे बहुतांश अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रसंगी त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत संबंधित विभागाला सांगितले आहे. महापालिकेसोबत बैठक घेऊन ट्राफिक स्पॉटवरील रस्ते सुधारण्याबाबत चर्चा करणार आहे. कारवाई करताना अनेकवेळा वादविवाद व राजकीय दबावाची शक्यता असते. यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांसोबत वाद न घालता नंबर लिहून घेऊन थेट खटला भरविण्यात येत आहे. मी स्वतः वाहन चालवताना नियम मोडणाऱ्यांचे क्रमांक लिहून खटला भरण्यास सांगितले आहे.

प्रश्न : नवीन आयुक्तालयात नवीन काय दिसणार?
उत्तर : नवीन आयुक्तालयात अनेक संकल्पना आणि उपक्रम पहिल्यांदा दिसत आहेत. यापूर्वी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. तोच उपक्रम पिंपरी चिंचवडमध्येही दिसणार आहे. पोलीस स्वतः नागरिकांकडे जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यास पोलीस काही मिनिटात घटनास्थळी हजर होतात. सर्व पोलीस ठाण्यात टीम तयार केल्या. फोन अ फ्रेंड ही संकल्पना राबवली. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस ठाण्यात ड्युटी ऑफिसर, गुन्हे शाखांमध्ये गडचिरोलीवरून आलेल्या पोलिसांना प्राधान्य दिले. आयुक्तालयाच्या हद्दीत दरबार घेऊन बदल्या केल्या. परवाना शाखा सर्व पोलीस ठाण्यात सुरु केल्या.

प्रश्न : शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न केले?
उत्तर : पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी काही टोळ्या कार्यरत होत्या. त्यांच्यामध्ये टोळीयुद्ध झाल्याच्या नोंदी आहेत. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. ही पथके खास गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत आहेत. अनेक गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का, तडीपार यांसारख्या कारवाई केल्या आहेत. गुन्हेगारी टोळ्यांतील गुन्हेगाराना अटक करत त्यांची दहशत कमी केली आहे. जलद प्रतिसादासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यान्वित केली आहे. रात्रीच्या वेळी कारवाई करणारी पथके आहेत. ही पथके रात्रीच्या वेळी गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.

प्रश्न : काही उपक्रम असे आहेत, ज्यामध्ये पोलीस रस दाखवत नाहीत?
उत्तर : मध्यंतरी शहरात सर्व पोलिसांसाठी एक विशेष उपक्रम राबवला होता. या उपक्रमामध्ये कोणत्याही पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचारी, अधिका-यांनी नियम मोडणा-या वाहनचालकांवर पुरावे मिळवून कारवाई करावी. अशी कारवाई करणा-या पोलिसांना बक्षीस देण्यात येईल. पण या उपक्रमात पोलिसांनी रुची दाखवली नाही. कामाच्या इतर गोष्टी, अनास्था किंवा आळस हे त्याचे कारण असू शकेल. पण ही योजना बारगळली आहे. त्याची कारणे शोधून त्यावर काम करण्यात येणार आहे.

प्रश्न : नागरिकांना काय आवाहन कराल?
उत्तर : पोलीस हे कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असतात. पोलिसांवर विश्वास ठेवावा. तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना योग्य प्रतिसाद देणयाबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कामात कसूर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांची फोटोसह तक्रार आल्यास संबंधितांवर खटला भरला जात आहे. नागरिकांनीही सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. नागरिक व पोलिसांनी समन्वयाने काम केल्यास कायदा सुव्यवस्था अबाधित राहून गुन्हेगारी कमी होईल यात शंका नाही. नागरिकांनी पोलिसांपर्यत पोहोचायला हवे. पोलिसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सांगितल्या तर त्या समस्या सुटणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.