Pimpri : शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड; 461 अवैध नळजोडांवर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या अवैध नळजोड सर्वेक्षणात शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड सापडले. त्यापैकी केवळ तीन हजार 391 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. तर, 461 अवैध नळजोड तोडले असून कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच पाच हजार 500 अवैध नळजोड सापडले असून त्यापैकी केवळ 20 जणांनी नळ कनेक्शन निमयिम करुन घेतले. तर, 106 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 202  अवैध नळजोड सापडले असून त्यापैकी 87 जणांनी कनेक्शन नियमित करुन घेतले असून 35 नळजोड तोडण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले होते. अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तथापि, नागरिकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.

अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार 325 अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 471 जणांनी अर्ज केले होते. पाणी पुरवठा विभागाने तीन हजार 391 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आजपर्यंत 461 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 202  अवैध नळजोड सापडले असून त्यातील 87 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले. तर, 35 नळजोड तोडण्यात आले आहेत. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात दोन हजार 608 अवैध नळजोड सापडले.  त्यातील 917 जणांनी नळ कनेक्शन निमयिम करुन घेतले असून 53 अवैध नळजोड तोडले आहेत.  ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन हजार 195 अवैध नळजोड सापडले होते. त्यातील 100  जणांनी नळ कनेक्शन निमयिम करुन घेतले. तर, 51 अवैध नळजोड तोडले आहेत.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 724 अवैध नळजोड सापडले होते. त्यातील 175 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले असून 74 अवैध नळजोड तोडले आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 20 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी 67 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले आहेत. तर, 42 अवैध नळजोड तोडले आहेत. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 908 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी एक हजार 637 कनेक्शन नियमित करण्यात आले. तर, 54 अवैध नळजोड तोडले आहेत.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 168 अवैध नळजोड सापडले असून त्यापैकी 388 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले आहेत. तर, 46 अवैध नळजोड तोडले आहेत. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक पाच हजार 500 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी केवळ 20 नळ कनेक्शन नियमित करण्यात आले. तर,106 अवैध नळजोड असे एकूण 461 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.