Pimpri : आवास योजनेतील 150 कोटींच्या गैरव्यहाराची चौकशी करा, अन्यथा न्यायालयात जाणार – शिवाजीराव आढळराव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविल्या जाणा-या रावेत, च-होली, बो-हाडेवाडी, डूडूळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेत तब्बल 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या गैरव्यहारबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली असून राज्य सरकार याची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे. सरकारने चौकशी न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. 

भोसरीत आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आढळराव बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटक सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरे मिळणार आहेत. या योजनेला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु, ज्या पद्धतीने ही योजना राबविली जात आहे. त्यामध्ये होणा-या भ्रष्टाचाराला आमचा विरोध असल्याचे सांगत खासदार आढळराव म्हणाले, ठेकेदारांना दमबाजी केली जाते. निविदा भरु दिल्या जात नाहीत. प्री-बिडला दहा ठेकेदार येतात आणि त्यानंतर तीनच ठेकेदार येतात. त्यांना धमकाविले जाते. जवळच्याच लोकांना कामे दिली जातात.

आरोप केल्यानंतर एक काम कमी करुन दहा कोटी कमी केले जातात. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर पुन्हा दहा कोटी कमी करतील. हा काय प्रकार आहे असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, यामध्ये 150 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सरकार याची चौकशी करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच पालिकेत ‘होलसेल’ पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरु आहे, असेही ते म्हणाले.

औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरी, खंडणी खोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त ही गुंडगिरी थांबवतील, अशी अपेक्षा आहे. भोसरीतील अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे पालिकेने आता अतिक्रमणावर कारवाई करावी, असेही आढळराव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.