Pimpri: ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय योजना’ म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी चराऊ कुरण – इरफान सय्यद

प्रशिक्षण योजनाच रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्यवाढ’ या योजनेत अनियमितता आहे. या योजनेचा महिलांना काडीमात्र फायदा होत नाही. दिखावू प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जनतेच्या कररूपी पैशांचा  अपव्यय केला जातोय. ठेकेदारांशी संधान साधून सत्ताधारी, प्रशासनाचे किती कोटकल्याण झाले, हे सर्वश्रुत आहे. सत्ताधारी केवळ चराऊ कुरण म्हणून, अशा योजनांना मंजुरी देत आहेत, असा आरोप महाराष्ट्र राज्य भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष व शिवसेना भोसरी व शिरूर सहसंपर्कपमुख इरफान सय्यद यांनी केला. तसेच प्रशिक्षण योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘पंडीत दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्यवाढ’ ही प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत अनेक तक्ररी आहेत. या प्रशिक्षण योजनेमार्फत स्वयंरोजगार मिळालेल्या किती महीला शहरात आहेत. याची माहिती महापालिकेच्या महिला बालकल्याण विभाग व नागरवस्ती विभागाकडे आहे का? केवळ अशा योजनांमधून करदात्या नागरिकांचा पैसा वाया घालवायचे धोरण राबविण्याचा प्रकार सत्ताधारी व महापालिका प्रशासन करीत आहे? पारदर्शक कारभाराचा नारा देऊन सत्तेवर आलेल्या सत्ताधारी पक्षाने तरी, अशा योजनेचा फायदा नक्कीच लाभार्थी महिलांना होतो की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.

यापूर्वीही महापालिकेच्या हद्दीत ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्यवाढ’ यासारखे उपक्रम महापालिकेने राबविलेले आहेत.  तरीही, महापालिका प्रशासनाने यासाठी निकोप स्पर्धा न ठेवता, कोणतीही निविदा न राबविता, थेट पद्धतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला काम दिले आहे. या संस्थेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, सत्ताधारी पक्षाने केवळ मलिदा लाटण्यासाठीच या संस्थेला काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.