Pimpri: जनतेच्या हितासाठी प्रयत्न करणे चूक आहे का?; नगरसेवक वाघेरे यांचे शिस्तभंगाच्या नोटीसला उत्तर

Is it wrong to strive for the public good ?; Corporator Waghere's reply to disciplinary notice : मी पक्षाच्याच हिताचे काम करताना पक्ष मला शिस्तभंग कारवाईची नोटीस देत असेल, तर ते माझ्यासाठी क्लेषकारक आहे.

एमपीसी न्यूज – लोकप्रतिनिधी म्हणून मला लोकांनी निवडून दिले  आहे. जनतेच्या हितासाठी मी प्रयत्न करणे, चूक आहे का ? मी पक्षाच्याच हिताचे काम करताना पक्ष मला शिस्तभंग कारवाईची नोटीस देत असेल, तर ते माझ्यासाठी क्लेषकारक आहे, असे उत्तर भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपच्या शिस्तभंगाच्या नोटीसला दिले आहे. तसेच वायसीएममधील घडलेल्या प्रकारचे व्हिडीओ रेकॉर्डिंग  असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आणि नगरसेवक वाघेरे यांच्यात 26 जुलै रोजी वादावादी झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते. यामुळे पक्षाची प्रतिम मलिन झाल्याचे सांगत सभागृह नेते नामदेव ढाके यांनी वाघेरे यांनी शिस्तभंगाची नोटीस बजाविली होती.

या नोटीसवर वाघेरे यांनी  पक्षाकडे खुलासा  सादर केला आहे. खुलाशात नगरसेवक वाघेरे म्हणतात,  मला पक्षाची ध्येय धोरणे, पक्षशिस्त व नियम ज्ञात आहेत. भाजपने उमेदवारी दिल्यावर मी शहरात सर्वाधिक 16,116 मत्ताधिक्यांनी  निवडून आलो.  एक लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना संकट आल्यापासून लोकांना मी मदत करत आहे.

वायसीएम रुग्णालयात झालेल्या प्रकारामध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील वृद्ध महिला कौशल्या कुदळे यांची प्रकृती खालावल्याने  त्यांचा मुलांच्या विनंतीनुसार रुग्णालयात सहकार्यासाठी गेलो होतो.

कुदळे या 23 जुलै रोजी वायसीएम रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या कोरोना पॉझिटीव्ह होत्या. मी प्रयत्न करून त्यांना प्लाझ्मा थेरेपीसाठी प्लाझ्मा उपलब्ध करून दिला.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मी वायसीएममधील प्रमुख डॉक्टरांना वारंवार विनंती करून कुदळे यांना आयसीयू विभागात हलविण्याचे सांगितले. तरीही डॉक्टरांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे मी वायसीएमला गेलो.

त्यावेळी तेथील वॉर्डमधील अन्य रुग्णांनी सांगितले की,  कुदळे या बेडवरुन पडल्या होत्या. त्यांना उठवायला येथे कोणी डॉक्टर, नर्स , कंपांउडर नव्हता. त्याचवेळी त्या मृत पावल्या होत्या.

मी  तेथे गेल्यावर डॉक्टर त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्याचे नाटक करू लागले. त्यावेळी मी त्यांना आता ‘त्या’ मृत पावल्यावर कशाला नाटक करता, असे म्हटलो असता तेथील डॉक्टर मला उद्धटपणे म्हणाले की, तुम्ही कोण? येथे कशाला आला? तुमचा काय संबंध ? त्यावेळी मी नगरसेवक आहे. या माझ्या प्रभागातील रहिवाशी आहेत असे सांगितले असता डॉक्टरने माझ्याशी हुज्जत घातली.

डॉक्टरांचा भोंगळ कारभार समोर आल्याने त्यांनी माझ्याविरोधात कुंभांड रचून माझ्यावरच आरोप केले. मी त्यांना कुठलीही शिवीगाळ केली नाही.

उपचार करणारे डॉक्टर हे पदव्दुत्तर पदवी ( पीजी) चे विद्यार्थी असल्याने त्यांना कायम करण्यास माझा विरोध असल्याने त्यांनी मला टार्गेट करून आंदोलन केले, असे वाघेरे यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.