Pimpri : राज्यात सत्तांतर होताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा

शिवसेनेचा बदली करण्यासाठी आग्रह

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे विरोधकांच्या या ‘शेलक्या’ विशेषणांमुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोपांनी अगोदरच बेजार झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राज्यात सत्तांतर होत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन झाल्याने आयुक्तांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी देखील आयुक्तांच्या बदलीची मागणी लावून धरली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत आयुक्तांची बदली होईल अशी चर्चा आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले. त्यामुळे हर्डीकर हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. आता राज्यात सत्ता बदल झाल्याने हर्डीकर यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.

27 एप्रिल 2017 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेणारे हर्डीकर सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. गतिमान, कार्यक्षम प्रशासन आणि पारदर्शक कारभारावर भर देऊ असे जाहीर करणा-या हर्डीकर यांच्या राजवटीत सर्वाधिक गडबड घोटाळे झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांच्याकडून पक्षपातीपणा केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक देतात . तसेच ते भाजपधार्जिणे असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना खासदारांनी वेळोवेळी केली आहे.

दोन वर्षाच्या कारकिर्दीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक देखील मोठा नवीन प्रकल्प हाती घेतला नाही. एकही चमकदार, उठावदार काम करता आले नाही. पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. पाण्याचे नियोजन देखील आयुक्तांना करता आले नाही. हिवाळ्यातच शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. शहरात पाणीबाणी सुरु आहे. कचरा कोंडी सोडविता आली नाही. आरोग्याचे तीनतेरा वाजले आहेत.

आयुक्त केवळ भाजपच्या काही पदाधिका-यांच्या सांगण्यावरुन ‘आदेश’ फिरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना काम न करता केवळ ‘आदेश काढणारे आयुक्त’ असे उपरोधिकपणे विरोधक बोलत आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहेत. आयुक्तांकडून अनेकदा सत्ताधा-यांना अनुकूल अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळेच ते विरोधकांच्या रडारवर आहेत. आता राज्यात सत्तांतर झाल्याने आयुक्त हर्डीकर यांची बदली जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like