Pimpri: महापौरांना प्रश्न स्वीकारण्याची अ‍ॅलर्जी आहे का?; नगरसेवकांचा सवाल

एमपीसी न्यूज – महासभेत प्रश्न विचारणे हा नगरसेवकांचा अधिकार आहे. प्रश्न उपस्थित केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील समस्यांवर साधक-बाधक चर्चा होईल. त्यातून योग्य मार्ग काढण्यास मदत होईल. प्रश्न विचारण्यामध्ये नगरसेवकांचा वैयक्तीक काही स्वार्थ नसतो. परंतु, महापौर राहुल जाधव प्रश्न का घेत नाहीत? हे समजत नाही. महापौरांना प्रश्न स्वीकारण्याची ‘अ‍ॅलर्जी’ आहे का? असा संतप्त सवाल सर्वपक्षिय नगरसेवकांनी उपस्थित केला.

महासभेत लेखी प्रश्न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार आहे. लेखी प्रश्न विचारल्यास अधिका-यांना लेखी उत्तरे देणे बंधनकारक असते. त्यामुळे शहरातील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होते. त्यातून शहरातील प्रश्नांचे वास्तव समोर येते. तथापि, महापौर राहुल जाधव यांच्याकडून लेखी प्रश्न स्वीकारले जात नाहीत. त्यांनी प्रश्न स्वीकारण्याची प्रथाच बंद करत नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. स्वपक्षाच्या नगरसेवकांचे देखील प्रश्न घेतले जात नसल्याने त्यांनी महापौर नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणत असल्याचा आरोप केला आहे.

  • महासभेत बोलताना विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, महासभेत नगरसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, महापौर राहुल जाधव प्रश्नच घेत नाहीत. त्यांना प्रश्न स्वीकारण्याची ‘अ‍ॅलर्जी’ आहे का? हे समजत नाही. शहरातील प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे. प्रश्न स्वीकारल्यास प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरातून शहराचे वास्तव समोर येते. त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत होईल. प्रत्येक महासभेला प्रश्न स्वीकारण्यात याव्यात. पहिल्या तासभर त्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी.

भाजपचे तुषार कामठे म्हणाले, पिंपळे निलख परिसरात पाण्याची मोठी समस्या आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात प्रश्न घेण्याबाबत मी तीनवेळा महापौरांकडे विचारणा केली. परंतु, महापौरांकडून प्रश्न घेतले जात नाहीत. प्रश्न का घेत नाहीत?, हे समजत नाही. प्रश्व विचारण्यात आमचा काही स्वार्थ नसतो. महापौरांनी प्रश्न स्वीकारणे आवश्यक आहे.

  • दरम्यान, नगरसेवकांच्या अधिकारांवर महापौर राहुल जाधव गदा आणत आहेत. महासभेत लेखी प्रश्न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार असताना महापौरांकडून लेखी प्रश्न स्वीकारले जात नाहीत. अधिका-यांना वाचविण्यासाठी महापौर विरोधकच नव्हे तर स्वपक्षिय नगरसेवकांचीच गळचेपी करत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.