Pimpri : इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन व बजाज ग्रुपने 32 लाख गरजूंना पुरवले जेवण

एमपीसी न्यूज – गेले 50 हून अधिक दिवस राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे अगदी खाण्यापिण्याचेही हाल होत होते. याच परिस्थितीत सामाजिक जाणीवेतून पुण्यातील इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन व बजाज ग्रुप यांच्यावतीने पुणे व पिंपरी चिंचवड परीसरात दररोज 90 हजार या प्रमाणे तब्बल 32 लाख नागरिकांच्या जेवणाची सोय करीत त्यांना मदतीचा हात देण्यात आला. यामध्ये लोहिया परिवारांचे मुकुंद भवन ट्रस्ट यांचेही सहकार्य लाभले.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर गरीब नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेत इस्कॉनचे संस्थापक आचार्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, पिंपरी यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात सुमारे 90 ठिकाणी गोरगरीब, गरजू मजूर यांच्यासाठी विविध ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

याद्वारे दररोज सुमारे 90 हजार नागरिकांपर्यंत 400 ग्रॅम कॅलरीज असलेलेला खिचडी पुलाव किंवा मसाले भात यांचे वितरण करण्यात येत होते. लॉकडाऊन दरम्यान आत्तापर्यंत किमान 32 लाख नागरिकांना याचे वितरण करण्यात आल्याची माहिती इस्कॉन अन्नामृतचे संचालक संजय भोसले यांनी दिली.

सुरुवातीला पिंपरी चिंचवड येथे आयसो ट्वेन्टी वन थाउजंड किचनमध्ये इस्कॉन अन्नामृतच्या मदतीने मध्यान भोजनाचा हा स्वयंपाक केला जात होता. मात्र, मागणी वाढत गेल्यानंतर इस्कॉन कात्रज कोंढवा रोड, बिंद्रा किचन, स्वारगेट अशा तीन ठिकाणी स्वयंपाक केला जाऊ लागला.

यासाठी रोज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून आरोग्याची पूर्ण काळजी व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत 80 कर्मचारी भोजन व्यवस्थेमध्ये कार्यरत असायचे, असेही भोसले म्हणाले.

या भोजन व्यवस्थेबरोबरच पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात भटक्या गाईंसाठी रोज चारा, बंद मंदिरांमधील सुमारे 200 गुरुजींना एक महिनाभर पुरेल एवढ्या धान्याचे वाटप, मध्यान भोजनासाठी आवश्यक भाजीपाल्याची थेट शेतकरी बांधवांकडून खरेदी, द प्राणा होमिओपॅथिक योगा सेंटरच्या मदतीने सुमारे 2 लाख होमिओपॅथिक औषधांचे वितरण, दीपक पायगुडे मित्रपरिवार व लोकसेवा फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त 1001 भगवद्गीता ग्रंथांचे वितरण, शहरातील वर्तमानपत्रात काम करणा-या 50 छायाचित्रकारांना महिनाभराचे किराणामालाचे सामान वाटप आदी उपक्रम देखील संस्थेच्या वतीने करण्यात आले.

या सर्व उपक्रमासाठी बजाज समूहाचे बजाज अलायन्स, जानकीदेवी ग्रामविकास संस्था, फिनोलेक्स, आदित्य पुरुषोत्तम लोहिया परिवारांचे मुकुंद भवन ट्रस्ट, मुकुल माधव फाउंडेशन, ट्रायडेंट इंटरनॅशनल, सिस्का, जीआयसी, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, या संस्थांनी मोलाची आर्थिक मदत केली. भोजनाच्या वितरण व्यवस्थेमध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसेवा फाउंडेशन, वंदे मातरम संघटना, बजरंग दल, आंबेडकर फुले शाहू समता मंच आणि अनेक पोलिसांनी देखील मदत केली.

वितरण व्यवस्थेमध्ये विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, नितीन वाटकर, श्रीदेवी व बजरंग दलाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष कुणाल साठे, संभाजी बालघरे, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शहा व समता मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी जबाबदारी उचलली.

अन्नामृत संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले, श्वेत देवदास डॉ. जनार्दन चितोडे, नटवर दास, सीतापती दास, विश्वनाथ कृपा दास, भक्ती भोसले, अनंत मंगरुळे यांनी किचनचे संपूर्ण व्यवस्थापन पाहिले. अन्नामृत फाउंडेशन तर्फे संपूर्ण भारतभर आज पर्यंत सुमारे दोन कोटी नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था कारण्यात आली.

इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज व परम पूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबविण्यात आला. अन्नामृत फाउंडेशन, भारत याचे चेअरमन कुशल देसाई व प्रमुख समन्वक डॉ. राधाकृष्ण प्रभू इस्कॉन पुणे आणि अन्नामृत्यचे संचालक संजय भोसले यांचे या योजनेसाठी मार्गदर्शन लाभले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपमहापौर तुषार हिंगे यांनी मास्क व सॅनीटायझर, व होमगार्ड वाहतूक यांची मदत केली. पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त माधव जगताप यांचीही या कामासाठी मदत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.