Pimpri : पोलीस आयुक्तालयाने सोशल मिडीयावर अॅक्टीव व्हावे; आयटीयन्सची मागणी

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड आयुक्तालय सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी अद्याप शहरातील तसेच आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आयुक्तालयाबाबत माहिती नाही. सध्या शहरात सोशल मीडियाचा वापर जवळपास प्रत्येकजण करतो. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने फेसबुक, व्हाट्स अप, ट्विटर यांसारख्ख्या सोशल मीडियाच्या माध्यामातून नागरिकांशी संवाद वाढवावा. त्यातून नागरिकांच्या सूचना, हरकती पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर पोहोचतील, अशी मागणी शहरातील आयटीयन्स आणि नागरीकांकडून करण्यात येत आहे.

आयटीयन अमित तलाठी म्हणाले, “हिंजवडी आणि शहरातील काही भागात वाहतूक शाखेकडून वाहतुकीत बदल करण्यात येतात. अचानक बदल केल्यामुळे नागरिक निश्चित केलेल्या वेळेत इच्छित स्थळी पोहोचू शकत नाहीत. तसेच शहरात मोरया गोसावी मंदिर, वैष्णवी देवी मंदिर अशी काही मोठी धार्मिक स्थळे आहेत. ठराविक दिवशी या धार्मिक स्थळांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी तसेच गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. सामाजिक संघटना यासाठी पोलिसांना सहकार्य करू शकतात, परंतु पोलीस आणि सामाजिक संघटना यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हायला हवा.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिका प्रशासनाची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी सारथी सुविधा सुरु केली. यामुळे नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद साधला जात आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयानेही सारथी प्रणाली सुरु करावी. ज्यामुळे पोलीस आयुक्तालय प्रशासन, हद्द, संपर्क, वाहतुकीचे नियम, कागदपत्रे याबाबत पुरेशी माहिती तात्काळ उपलब्ध होईल. पोलीस हेल्पलाईनमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद साधला जाईल. आजपर्यंत एकही पोलीस आयुक्त हिंजवडीतील वाहतुकीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष आले नाहीत, परंतु आर के पद्मनाभन यांनी हिंजवडी मधील शिवाजी चौकात येऊन उत्तम वाहतूक व्यवस्थेचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला आहे. हा सुसंवाद टिकून राहायला हवा, असेही तलाठी यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. केवळ पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला, तर समस्या सुटतील असे नाही. त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सकारात्मक सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच पोलीस आयुक्तालयाच्या विविध शाखांची नागरिकांच्या उपयोगी पडणारी माहिती एका वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल. तसेच नागरिकांच्या सहभाग आणि माहितीसाठी सोशल मीडियाचा देखील वापर करण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

नागरिकांना तसेच शहरातील सामाजिक संघटना पोलीस प्रशासनाला मदत करू इच्छित असतील तर त्यांनी त्याबाबत पोलीस प्रशासनासोबत संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सामाजिक संघटनांच्या मदतीने देखील अनेक समस्या सोडवू शकणार आहे. सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी आयुक्तालय कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.