Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे नदी स्वच्छता अभियान उत्साहात

भारतीय नदी दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान आज (रविवारी) थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पार पडले. या अभियानात भारतीय नदी दिवसानिमित्त 200 लोकांनी पवना नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. आज नदीमधून सात ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित आजचा जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई या अभियानाचा आज 265 वा दिवस होता. आजपर्यंत एकूण 1550 ट्रक जलपर्णी नदी पात्रातून बाहेर काढण्यात आली. अभियानात थरमॅक्स कंपनी, प्राज कंपनीची टिम व या नदीवर नेहमी काम करणारे शेकडो नदी प्रेमी सहभागी झाले. रो सचिन खोले व रो प्रणाली सोमनाथ हरपुडे यांचे वाढदिवस संपुर्ण परिवारासह घाटावर साजरे केले. यावेळी त्यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश या अभियानासाठी दिला.

मागील एक आठवड्यापासून भारतीय नदी दिवस निमित्त रानजाई प्रकल्प देहू व एस पी वायर्स ची टिम नदी स्वच्छतेचे काम करत आहेत. अमृता विद्यालय निगडी मधील पाचवी ते दहावीचे 100 विद्यार्थी मंगळवार (दि. 27 ) व बुधवार (दि. 28) रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत तर क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल रावेत येथील विद्यार्थी संध्याकाळी केजुबाई बंधारा येथे नदीची व्यथा समजून घेण्यासाठी येणार आहेत.

बुधवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत पवना नदीची आरती केजुबाई बंधारा येथे करण्यात येणार आहे. या आरतीने भारतीय नदी दिवसानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमांची सांगता होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जलदिंडी प्रतिष्ठान, भावसार व्हिजन, रानजाई प्रकल्प देहू आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन हे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी सोबत पवनामाईची आरती करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.