Pimpri : जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीत सांगवी अव्वल; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दापोडी दुस-या तर आळंदी तिस-या क्रमाकांवर

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सर्वेक्षणातील माहिती

एमपीसी न्यूज – नदीजवळील परिसरच डासाच्या उत्पत्तीचे उगमस्थान आहे. जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर अव्वल आहे. तर, दापोडी दुस-या आणि आळंदी तिस-या क्रमाकांवर आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

वर्षाच्या सुरवातीच्या तुलनेत ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरीस पिंपरी-चिंचवड शहरातील डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समितीच्या परीक्षणामध्ये आढळून आले. जलपर्णी आणि नदीप्रदूषण ही दोन कारणे यासाठी महत्वपूर्ण असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. समितीने 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान दापोडी, सांगवी, पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी पवना नदी परिसर, देहू, आळंदी इंद्रायणी नदी परिसर तसेच प्राधिकरण, चिंचवडगाव, पिंपरी, आकुर्डी, रावेत, नेहरूनगर, पिंपळेसौदागर, परिसरातील खासगी तसेच सरकारी दवाखाने व रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणीत सांगवी, दापोडी आणि आळंदी परिसरातील जास्त रुग्णांनी उपचार घेतले असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये डेंगू, मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते.

निरीक्षण पथकामध्ये अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयवंत श्रीखंडे, पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी, अॅड. विद्या शिंदे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, राम सुर्वे, मंगेश घाग, अजय घाडी, सतीश मांडवे, समीर चिले, अमोल कानू, जयेंद्र मकवाना, बळीराम शेवते, विजय जगताप, राजेश बाबर, तेजस सापरिया, कपिल पवार, रामेश्वर गोहिल, सतीश मांडवे, अमृत महाजनी, उद्धव कुंभार, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले यांनी सहभाग घेतला.

समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ”ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरीस पिंपरी-चिंचवड शहरातील डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे महिनाभर नदी परिसर, दवाखान्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये नदीकिनारच्या परिसरातील सर्वाधिक रुग्ण आढळले. सर्वाधिक डासांची उत्पत्ती सांगवी परिसरात होत आहे. जलपर्णीच डासाच्या उत्पत्तीचे उगमस्थान आहे. शहराच्या आरोग्याशी नदीचा थेट संबंध आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने नद्या जलपर्णीमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे साथीचे रोग कमी करण्याकरिता परिसरात औषध तसेच पावडर, धूर फवारणी मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे”.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

जलपर्णी (इकॉर्निया क्रासिप्स) ही पाणवनस्पती हिवाळ्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर अखेरपासून नदीचे पात्र व्यापून टाकण्यासाठी तत्पर आढळली. जिथे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण तिथे हमखास जलपर्णी मोठ्या प्रमाणात दिसून आली. डासांसारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी जलपर्णी उत्तम चेंबरनिर्मितीचे कार्य करीत आहे. जलपर्णी ही पवना व इंद्रायणी नदीतील ऑक्सिजन शोषून घेत असल्याचे निदर्शनास आले.

शहरातील दवाखाने आणि रुग्णालयांची सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमधील ताप, डेंगू आणि मलेरिया संदर्भातील रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती 16 हजारच्या पुढे गेलेली आढळली. नदीकिनारी असणारी उपनगरे म्हणजेच दापोडी, सांगवीगाव परिसर, पिंपरी, मोरया गोसावी चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत, आळंदी, देहू या ठिकाणी रुग्णांचे प्रमाण दुप्पट आढळले.

जलपर्णी हटविताना किंवा यंत्रसामुग्रीच्या साह्याने नदीपात्र साफ करताना महापालिकेचे कर्मचारी, ठेकेदार कोठेही आढळून आले नाहीत. सर्वात जास्त डास निर्मिती सांगवी परिसरात दिसून आली. तर, सर्वात कमी वाल्हेकरवाडी नदी परिसरात डास आढळले. त्यानंतर दापोडी, आळंदी, थेरगाव, पिंपरी, चिंचवडगाव, देहू, रावेत परिसरात डासाची निर्मिती होत असल्याचे आढळले. अस्वच्छता व जलपर्णी प्रमाण हे डासनिर्मितीचे निकष म्हणून पाहण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.