Pimpri: जानकीदेवी बजाज संस्थेने वायसीएमच्या डॉक्टरांना दिले ‘पीपीई’ कीट

एमपीसी न्यूज – आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधातील युद्ध लढणा-या वायसीएमधील डॉक्टर, नर्स, अधिकारी, मदतनीस, सफाई कामगारांना बजाज उद्योग समुहाच्या जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था आणि सीएसआरच्या माध्यमातून पीपीई कीट देण्यात आले. डॉक्टर, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी 13 लाख एक हजार रुपयांच्या कीट देण्या आल्या आहेत. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष, सीएसआरचे सल्लागार सी.पी.त्रिपाठी यांनी दिली.

संपूर्ण जगावर जागतिक आरोग्य आपत्ती आली आहे. कोरोनाने भारतालाही ग्रासले आहे. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी अनेक मोठ्या व्यावसायिकांचे हात मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यात बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी देखील देशासाठी 100 कोटी रुपये दिले आहेत. देशातील पाच राज्यात या अंतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी याचा उपयोग होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, नर्स, निमवैद्यकीय कर्मचा-यांना प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी पीपीई कीटची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

त्यामुळे आरोग्य किटची आवश्यकता लक्षा घेता अहोरात्र सेवा देणा-या कर्मचा-यांच्या स्वसुरक्षिततेसाठी बजाज समूहाच्या जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था आणि सीएसआर यांच्या माध्यमातून वैद्यकीय विभागासाठी 13 लाख एक हजार रुपयांच्या पीपीई कीट देण्यात आल्या.

संस्थेचे अध्यक्ष, सीएसआरचे सल्लागार सी.पी.त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने वायसीएम रुग्णालयास या कीट सुपुर्त करण्यात आल्या. वैद्यकीय कर्मचा-यांसाठी कीट उपलब्ध करुन दिल्याने महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी जानकीदेवी बजाज संस्थेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.