Pimpri: काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शुक्रवारी पिंपरीत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राबरोबरच देशभरातील जनतेवर मागील चार वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करीत अन्याय केल्याचा आरोप करत आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने 31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. कोल्हापूर येथून सुरु केलेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून शुक्रवारी (दि.7)रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे.

पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी पाच जनसंघर्ष यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, सरचिटणीस रत्नाकर महाजन आदींसह प्रदेश कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

कोल्हापूर येथून सुरु झालेल्या या जनसंघर्ष यात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या कार्यकालात जातीय सलोखा राहिला नाही. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांचा होता तो ही रोजगार हिरावून घेतला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही, याचा जाब विचारण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे जनसंघर्ष यात्रेत सहभागी होत आहेत. नागरिकांच्या पैशातून फसव्या जाहिराती हे सरकार करीत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रचा जाहिरातबाजीचा फसवा फुगा आता फुटला आहे. शेतक-यांच्या आत्महत्येत, बेरोजगारीत, गुन्हेगारीत, महागाईत लक्षणीय वाढ होत आहे. बांधकाम क्षेत्रासह उद्योग व्यापारात देखील मंदीचे सावट आहे, अशी टीकाही साठे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.