Pimpri : पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या आता सह शहर अभियंता करणार

एमपीसी न्यूज – प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने पाणीपुरठा व जलनि:सारण विभागाच्या सह शहर अभियंत्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांची बदली करण्याचे अधिकार त्यांना मिळाले आहेत. मात्र, या बदल्या करण्याचे अधिकार केवळ पाणीपुरवठा व जलनि:सारण मुख्य कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरठा व जलनि:सारण विभागापुरते मर्यादित असणार आहेत.

सरकारी कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध नियम 2013 नुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 72 मध्ये आयुक्त हे त्यांच्या हाताखाली काम करणा-या दुय्यम अधिका-यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी सोपविण्यात आलेल्या अधिकारांची यादी प्रसिद्ध करतील, अशी तरतूद आहे. त्यानुसार, कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विभागप्रमुख गट अ आणि गट ब च्या अधिका-यांना 29 ऑगस्ट 2013 आणि 2 जानेवारी 2016 रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेतील कामकाजाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने काही अधिकार प्रदान करणे आवश्यक आहेत.

त्यानुसार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश जारी केला असून पाणीपुरठा व जलनि:सारण विभागाच्या सह शहर अभियंत्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महापालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी संवर्गातील कार्यरत प्रशासकीय व तांत्रिक पदावरील कर्मचा-यांची बदली करण्याचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. केवळ पाणीपुरवठा व जलनि:सारण मुख्य कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरठा व जलनि:सारण विभागापुरते हे अधिकार मर्यादित असणार आहेत.

पाणीपुरठा व जलनि:सारण विभागाच्या सह शहर अभियंता यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार पूर्ण क्षमतेने वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय नि:पक्षपातीपणे वापरावेत. अधिकाराचा वापर न करणे, निर्णय घेण्याकरिता प्रकरणे वरिष्ठांकडे सादर करणे, हे कर्तव्य पालनातील दुर्लक्ष समजण्यात येईल. वरिष्ठ अधिका-यांकडून या कसुरीबद्दल संबंधित अधिका-याच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येईल. वरिष्ठ अधिका-यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा संदर्भ देऊन अशी प्रकरणे दुय्यम अधिका-याकडे परत पाठवावीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like