Pimpri : पत्रकारितेसाठी निष्ठा व चिकाटी आवश्यक – श्रीकांत चौगुले

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. दिलासा संस्था, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि शब्दधन काव्यमंच आयोजित हा कार्यक्रम शनिवारी (दि.1) फुगेवाडी येथे पार पडला.

याप्रसंगी शिर्के यांच्या “कृष्णाकाठ ते पवनाकाठ” या आत्मचरित्रपर ग्रंथाचा तसेच “ही पैशाची किमया सारी” ही लघुनाटिका या पुस्तकांचा प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.कोरोनाच्या पाश्वभूमीवर अगदी मोजक्या कार्यकर्त्यांसह सोशल डिस्टस्टिंगचे पालन करून शिवाजीराव शिर्के यांच्या  कार्याला सलाम करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व  निवेदक श्रीकांत चौगुले होते. याप्रसंगी कवयित्री मधूश्री ओव्हाळ, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे, कवी सुभाष शहा, दिलीप ओव्हाळ, सुमन शिर्के, पत्रकार प्रवीण शिर्के, योगिता शिर्के, अवधूत शिर्के, धनश्री शिर्के  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले याप्रसंगी म्हणाले, समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद होत आहे. त्यासाठी नाविन्याचा ध्यास घेऊन सतत कार्यमग्न असणे हे नवनिर्मितीला आणि सामाजिक जाणिवा समृद्ध करण्यास चालना देणारे असते.

शिवाजीराव शिर्के यांचे जीवन कामगारांसमोर नवा आदर्श निर्माण करणारे आहे. विपुल लेखन, ऐतिहासिक संशोधन, विविध संस्थांच्या माध्यमातून करीत असलेले सामाजिक कार्य ते आजही सातत्यपूर्ण करीत आहेत. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि आनंदात जायचे असेल तर स्वतःला चांगल्या कामात गुंतवून घेतले पाहिजे. विधायक कार्यात कार्यरत राहणे  जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढवते. पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठा, चिकाटी आणि सत्यता या अंगभूत गुणांची आवश्यकता असते असे चौगुले म्हणाले.

असंख्य कामगारांना बहुमोल मार्गदर्शन करून नवी दिशा देणारे शिवाजीराव शिर्के हे श्रमिक जगताचे तीर्थक्षेत्र असल्याचे उद्गार शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी काढले. मुरलीधर दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.