Pimpri: कोरोनासाठी जून महिना ठरतोय धोकादायक! पाहा वाढलेली आकडेवारी

Pimpri: June is dangerous for Corona! See increased statistics in pimpri-chinchwad आजपर्यंत शहरातील 2375 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1389 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होत आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 1 ते 25 जूनपर्यंत तब्बल 1853 रुग्णांची वाढ झाली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला होता. एकाचदिवशी तीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे राज्याचे शहराकडे लक्ष लागले होते. त्यानंतर रुग्णवाढीचे प्रमाण कमी होते.

शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतानाच दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रुग्ण वाढ सुरु झाली. कोरोनाने झोपडपट्यांमध्ये देखील शिरकाव केला. झोपडपट्ट्या, चाळी व दाट लोकवस्तीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

शहरात 10 मार्च ते 31 मे या 81 दिवसात 522 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. एकूण रुग्णवाढीत हा दर 25 ते 27 टक्के राहिला आहे. या कालावधीत शहरातील अवघ्या आठ आणि शहराबाहेरील 12 जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर जूनमध्ये कोरोनाने कहर सुरु केला. 1 ते 25 जून या 25 दिवसांत 1853 नवीन रुग्ण वाढले. एकूण रुग्णवाढीचा वेग 75 ते 78 टक्के असल्याचे दिसते. या कालावधीत 48 जणांचा मृत्यू झाला.

जून महिना संपण्यास आणखी पाच दिवसांचा अवधी आहे. या पाच दिवसांत किती रुग्ण वाढतात हे पाहणे महत्वाचे आहे. आजमितीला शहरातील रुग्ण संख्या 2375 वर जाऊन पोहोचली आहे.

सक्रिय 945 पैकी 91 रुग्णांमध्ये लक्षणे

आजपर्यंत शहरातील 2375 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1389 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 945 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यापैकी केवळ 91 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर, 34 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. चिंतेची बाब म्हणजे तब्बल 819 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. हे रुग्ण कोरोना वाहक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत 41 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील तब्बल 931 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 616 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 301 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 256 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 268 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

आजपर्यंत 23 हजार 351 जण होम क्वारंटाईन

आजपर्यंत होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या 23 हजार 351 आहे. त्यापैकी 3929 सध्य होम क्वारंटाईन आहेत. तर, 4741 पॅसिव्ह क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत 28 दिवस सर्वेलियन पूर्ण झालेले म्हणजे क्वारंटाइनचा कालावधी संपलेल्या नागरिकांची संख्या 14 हजार 669 आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.