Pimpri : कबड्डी संघाच्या मार्गदर्शिकेने लगावली खेळाडूंच्या कानशिलात

एमपीसी न्यूज – कबड्डी राज्य निवड स्पर्धेत हरल्याच्या रागातून संघाच्या मार्गदर्शिकेने दोन कबड्डी खेळाडू मुलींच्या कानशिलात लगावली. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी खेळाडू मुलीच्या आईने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे संबंधित मार्गदर्शिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विमल मोरे यांनी याप्रकरणी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, विमल मोरे यांची मुलगी राधा मोरे आणि तिची सहकारी खेळाडू अनुष्का फुगे या दोघी पुणे जिल्हा महिला कबड्डी संघात खेळत आहेत. 9 ते 12 डिसेंबर रोजी परभणी येथे कुमारगट राज्य निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राधा आणि अनुष्का दोघी पुणे जिल्हा महिला संघातून खेळत होत्या. या संघाच्या मार्गदर्शिका शिल्पा भंडारी-भोसले होत्या. तर संघव्यवस्थापक सुवर्णा येणपुरे होत्या. या स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाचा बाद फेरीमध्ये पराभव झाला. त्या रागातून संघाच्या मार्गदर्शिका शिल्पा भंडारी-भोसले यांनी राधा आणि अनुष्का यांच्या कानशिलात लगावली. त्या दोघींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच संघव्यवस्थापक सुवर्णाचे येणपुरे यांनाही धक्काबुक्की केली.

तसेच स्पर्धेदरम्यान शिल्पा भंडारी खेळाडूंना रात्री उशिरापर्यंत राजकारणाच्या गप्पा सांगून झोपू देत नव्हत्या. झोपणे, उठणे, जेवणे यावर त्यांनी बंधने आणली. तक्रारदार विमल मोरे या धुणीभांडी करून मुलीचे शिक्षण आणि तिच्या खेळाची आवड जोपासतात. एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा त्या मुलीला खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. मात्र संघाच्या मार्गदर्शकाकडून अशी वागणूक मिळत असल्याने खेळाडूसह त्यांच्या घरच्यांचे देखील मनोबल कमी होत आहे. त्यामुळे मार्गदर्शिका शिल्पा भंडारी-भोसले यांची मार्गदर्शिका पदावरून हाकलपट्टी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.