Pimpri : कैलास कदम यांच्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला भिवंडीमधून अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – माजी विरोधी पक्षनेता कैलास कदम यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना पोलीस कोठडीतून पळून जाण्यासाठी मदत करणा-या फारर आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भिवंडी येथून अटक केले आहे. याप्रकरणी आरोपीवर मोकाचीही कारवाई करण्यात आली आहे.

धनराज उर्फ धर्मा दास कांबळे (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 साली कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट तडीस नेण्यासाठी अॅड. सुशील मंचरकर याने त्याचे साथीदार हमीद शेख, सचिन जाधव, सुरेश झेंडे आणि पोलिसांच्या मदतीने खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या संतोष उर्फ लुब्या चिंतामणी चांदीलकर, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे आणि संतोष जगताप या सराईत गुन्हेगारांना पोलीस कोठडीतून पळवून लावले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • कैलास कदम खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात संतोष चांदीलकर, राजू पात्रे या दोघांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडे पोलीस कोठडीत असताना चौकशी केली असता या गुन्ह्यात अॅड. सुशील मंचरकर याने त्याचे साथीदार हमीद शेख, सचिन जाधव, सुरेश झेंडे यांच्यासह गिड्या उर्फ विशाल नागू गायकवाड, गणेश रघुनाथ अहिवळे, विनायकुमार रामसजीवन कुर्मी यांनीही मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या सर्वांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर या गुन्ह्यात कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबाबत पाच पोलीस कर्मचा-यांवर देखील कारवाई करण्यात आली.

आरोपी धर्मा हा येरवडा येथे खूनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. तो 2017 मध्ये पेरॉलवर सुटला असता त्याने कैलास कदम यांच्या खूनाच्या कटासाठी मुख्य आरोपींना शस्त्र पुरवठा केला होता. तसेच तो पेरोलचा कालावधी संपला तरीही परत कारागृहात दाखल न होता गेल्या दोन वर्षापासून फरार होता. यावेळी पुणे आयुक्तालयाने त्याच्यावर मोकाची कारवाई केली होती. या प्रकरणातील धर्मा कांबळे, दत्ता इंगळे हे आरोपी अद्यापही फरार होते.

  • पोलीस नाईक महेंद्र तातळे यांना माहिती मिळाली की, आरोपी धर्मराज भिंवडी येथे रहात असून एका पेट्रोल पंपावर काम करत आहे. त्यानुसार पोलीस तपासावर गेले. यावेळी तो तेथे एका पेट्रोलपंपावर काम करत असल्याची खबर तपासी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वतःची ओळख लपवत रोडवरील प्रत्येक पेट्रोलपंपावर जाऊन डिझेल भरण्याच्या निमित्ताने त्याचा शोध घेतला. येवई गावातील येथील अक्षय पेट्रोलपंपावर धर्माशी मिळता-जुळता एक इसम दिसला. यावेळी त्याच्या चेहऱ्यात त्याने बराच बदल केला होता. मात्र, त्याच्या डाव्या गालाच्या जखमेच्या वणावरून त्याची ओळख पोलिसांना पटली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने ओळख कबुल करत गुन्हा केल्याचे कबुल केले.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, तसेच पोलीस कर्मचारी महेंद्र तातळे, अमित गायकवाड, सुनिल चौधरी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.