Pimpri : महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवा; आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – भगवान महावीर जयंतीनिमित्त उद्या (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावीत. महावीर जयंती अहिंसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक्या जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरिता शहरातील मटण, चिकन आणि मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

याबाबत आमदार लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावीर स्वामी यांनी ‘जिओ और जीने दो’ हा संदेश संपूर्ण जगाला दिला. याच अनुषंगाने या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे. जैन बांधवही या शहरात गुण्या गोविंद्याने राहत आहेत. सर्व समाजबांधव आपआपले सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महावीर जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी एकोपा दाखवला पाहिजे.

  • ब्रिटीश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने महावीर जयंतीला सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही जैन बांधवांच्या भावनांचा विचार करुन सर्व समाज बांधवांनी मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.