Pimpri: यंदापासून महापालिकेच्या बालवाडीतील मुलांनाही पोषण आहार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शैक्षणिक वर्षांपासून बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्यास सुरुवात केली आहे. शिरा, शेंगदाणा, गूळ, राजगिरा, चुरमु-यांचे लाडू, उसळ, पुलाव, उपीट असा सहा दिवस वेगवेगळा आहार दिला जाणार आहे. आहार मिळत असल्याने बालवाडी मधील मुलांच्या चेह-यावर आनंद दिसून येत असून पटसंख्या वाढीस मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या 207 बालवाड्या सुरू आहेत. या बालवाड्यांमध्ये आठ हजार मुले शिक्षण घेत आहेत. खासगी बालवाड्यांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांमधील मुलांची ही पटसंख्या अत्यंत कमी आहे. त्यापार्श्वभुमीवर बालवाडीची पटसंख्या वाढविण्यासाठी यंदापासून पोषण आहार देण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालकल्याण समितीने हा निर्णय घेतला आहे. नागरवस्ती विभागाकडून या खर्चाला मान्यता मिळाली असून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या खर्चातून सहा दिवस मुलांना शंभर ग्रॅमपर्यंतचा आहार मिळणार आहे. त्यात शिरा, शेंगदाणा, गूळ, राजगिरा, चुरमु-यांचे लाडू, कडधान्याची उसळ, पुलाव, उपीट मिळणार आहे. त्यासाठी मुलांचा छोटा आणि मोठा गट तयार केला आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या उषा मुंडे म्हणाल्या, ”खासगी बालवाड्यांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या अत्यंत कमी होती. बालवाड्यांची पटसंख्या, मुलांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी गणवेश, दप्तर, खाऊ आणि बौद्धिक खेळणीवाटपाची आवश्यकता होती. परंतु, असा उपक्रम राबविला जात नसल्याने बालवाडीची पटसंख्या वाढण्याऐवजी दिवसें-दिवस घटत चालली होती. त्यामुळे यंदापासून समितीने पोषण आहार सुरु केला आहे. यामुळे बालवाडीतील पटसंख्या वाढीस मदत होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.