Pimpri: कोल्हापूरचा विराट मडके याचं “केसरी”मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

एमपीसी न्यूज – सुजय डहाके दिग्दर्शित आणि संतोष रामचंदानी निर्मित कुस्तीवर आधारित “केसरी” चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून कोल्हापूरचा विराट मडके हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता “शाळा” चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे कुस्ती वर आधारित केसरी – सॅफरॉन हा मराठी चित्रपट. मराठी चित्रपट सृष्टीत नेहमीच प्रयोगशील असणारा आणि नेहमीच नाविन्यपूर्ण विषयाची निवड करणारा दिग्दर्शक म्हणून सुजय डहाकेची ओळख आहे. शाळा, फुंतरू आणि आजोबा असे आशयघन चित्रपट सुजयने केले आहेत.

केसरी – सॅफरॉन ह्या चित्रपट द्वारे मुळचा कोल्हापूरचा असलेला अभिनेता विराट मडके चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे. चित्रपटामध्ये विराट पैलवानाच्या भूमिकेत दिसणार असून त्याने कोल्हापूरच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी’, ‘रुस्तूम – ए – हिंद’ किताब पटकावलेल्या अमोल बुचडे व ‘हिंद केसरी’, ‘महान भारत केसरी’ रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवानकिचे धडे घेतले आहेत.

लहानपणासून अभिनयाबरोबरच खेळाची आवड असलेल्या विराट ने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच प्रायोगिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजपर्यंत अनेक एकांकिकांमध्ये कामे केली असल्याचं विराट सांगतो. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून विराट त्यामध्ये खूप मेहनत घेताना दिसत आहे . महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, जयवंत वाडकर यांच्याबरोबर इतर मराठी कलाकार ह्या चित्रपटामधून दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

भावना फिल्म्स, एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती संतोष रामचंदानी व मनोहर रामचंदानी यांनी केली आहे. २८ फेब्रुवारी २०२० ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तो मराठी बॉक्स ऑफिस किती धुमाकूळ घालतो? हे पाहणे औसत्युक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.