Pimpri: प्रभागस्तरावर लोकसहभागातून कोविड सेंटर उभारणार – आमदार महेश लांडगे

Kovid Center to be set up at ward level through public participation - MLA Mahesh Landage : प्रत्येक प्रभागात 100 बेडचे कोविड सेंटर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आता ‘लोकसहभागातून’  प्रभागनिहाय कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्याची सुरुवात भोसरी मतदारसंघातून होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेली आहे. आरोग्य व्यवस्थापनाची क्षमता पाहता आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडू लागले आहेत. तसेच, कोरोना सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरही मोठा ताण आहे.

परिणामी, रुग्णांची सेवा सुश्रृषा आणि सुविधांवरुन समाजात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत महापालिका वैद्यकीय विभाग, आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, महापालिका आयुक्त आणि आमदार महेश लांडगे यांच्यात बुधवारी बैठक झाली.

प्रत्येक प्रभागात 100 बेडचे कोविड सेंटर

संपूर्ण शहरात एकूण 32 प्रभाग आहेत. त्यापैकी भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 12 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येईल. त्या प्रभागातील खासगी शाळा- महाविद्यालयांची जागा त्यासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.

तसेच, प्रभागातील विद्यमान चार नगरसेवक आणि त्यांच्या मदतीने आठ ते दहा स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे. त्याआधारे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी-स्वयंसेवकांच्या मदतीने कोविड सेंटरचे कामकाज पाहिले जाईल.

यामुळे रुग्णांना घरापासून जवळ अंतरावर उपचार किंवा क्वारंटाईन सुविधा उपलब्ध होईल. कोविड सेंटरमध्ये आवश्यकता असेल तर रुग्णांच्या कुटुंबियांना घरातून जेवन उपलब्ध करुन देता येईल.

अशाप्रकारे भोसरी मतदार संघातील 12 प्रभागात एकूण 1 हजार 200 बेडची सुविधा उपलब्घ होईल. परिणामी, यशवंतराव चव्हण स्मृती रुग्णालयावर असलेला ताण कमी होणार आहे.

केवळ गंभीर किंवा अतीगंभीर रुग्णांना ‘वायसीएम’मध्ये पाठवता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.