Pimpri : केपीआयटी स्पार्कल स्पर्धेची अंतिम फेरी पीसीसीओईमध्ये

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केपीआयटी स्पार्कल 2019 या स्पर्धेची अंतिम फेरी पीसीसीओईमध्ये शनिवारी (दि.23) व रविवारी (दि.24) आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी व पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांनी आज गुरुवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

केपीआयटी स्पार्कल 2019 या स्पर्धेत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग, अटल इंनोव्हेशन मिशन, एआयसीटीई, इंडिया डिझाईन कौन्सिल, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा सहभाग आहे. या वर्षाचा विषय ऊर्जा आणि गतीशीलतेचे भवितव्य असा आहे.

शनिवारी दि. 23 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता उदघाटनाच्या सत्रात इन्स्टिटयूट ऑफ फ्युचर ट्रान्सपोर्ट अॅंड सिटीजचे संचालक डॉ. कार्ल पेरीन, ऑडी कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. पीटर आणि बेंगलोर येथील सिपीडीएम, आयआयएससीचे अध्यक्ष डॉ. अमरेश चक्रवर्ती हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच समारोप व बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि.24 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्चचे संचालक डॉ. शेखर मांडे, निती आयोगाचे पद्मभूषण डॉ. वि. के. सारस्वत, अटल इंनोव्हेशन मिशनचे प्रमुख डॉ. उन्नत पंडीत आणि एआयसीटीचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे आदी उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेसाठी देशभराचून 26 राज्यांतून 22000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार पेक्षा जास्त प्रकल्प सादर केले. त्यांचे अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील अनुभवी परीक्षकांनी परीक्षण करुन त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडले आहेत. स्पर्धा व सादरीकरण रविवारी दि. 24 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर असणार आहेत.

या पत्रकार परिषदेला समन्वयक केपीआयटी प्रा. राहुल पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, केपीआयटी सहउपाध्यक्ष राहुल उपलप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.