Pimpri : बांधकाम मजुरांच्या प्रश्नासाठी कामगार कार्यालयावर महामोर्चा – बाबा कांबळे

एमपीसी  न्यूज –   बांधकाम मजुरांसाठी सरकारने इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहेत. मंडळात आज रोजी सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या पैशाचा उपयोग बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने कामगार खात्या अंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या असून, यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे, मध्यान्ह भोजन देणे आदी योजनांचा सहभाग आहे, सेफ्टी साधन पुरविणे ही बिल्डरची जबाबदारी आहे आणि ते आता पुरवत आहेत. मजुरांना साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन कसे? आणि कोठे देणार? हे शक्य नाही यामुळे एक हजार कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात जाणार आहेत. यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत वतीने अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

“नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप मंडळाच्या वतीने सुरु आहे, यासाठी मंडळाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व मजुरांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्ष मात्र दिवाळी संपली तरी मजुरांना पाच हजार रुपये मिळाले नाही.” सध्या अमलात असलेल्या योजना बांधकाम मजुरांपर्यंत पोहचत नाहीत, मग एक हजार कोटींची निविदा कशासाठी आणि कोणासाठी काढली जात आहे. असा सवाल करत ही निविदा रद्द करा, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.

एक हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या निविदा रद्द कराव्यात यासाठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, येत्या 13 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथील कामगार कार्यालयावर सकाळी 11 वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, पिंपरी येथुन महामोर्चास सुरवात करण्यात येणार आहे. टप्याटप्याने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. एक हजार कोटींच्या निविदा रद्द करून, हे पैसे बांधकाम मजुराच्या खात्यात जमा न केल्यास, महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.