Pimpri : राज्यातील कंपन्यांनी कामगारांचे वेतन त्वरीत  द्यावे – इरफान सय्यद 

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार व राज्य सरकारने कंपन्यांनी कामगारांचे वेतन देण्याचे आदेश देऊनही महाराष्ट्रतील काही कंपन्यांच्या आस्थापनांनी, ठेकेदारांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी अद्याप कामगारांना वेतन दिलेले नाही. कंपन्यांनी सामाजिक भान जपत शासनाच्या आदेशानुसार कामगारांचे त्वरीत वेतन द्यावे. असे आवाहन महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्यातील व पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील कंपन्यांच्या मालकांना आणि बांधकाम व्यवसायिक व ठेकेदारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे शुक्रवारी (दि.1) रोजी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे,  देशभरासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या 21 मार्चपासुन लाॅकडाऊनमुळे उदयोगधंदे व  बांधकाम प्रकल्प बंद आहेत. कंपनीत काम करणा-या कामगारांच्या सोबतच कष्टकरी, कामगार, मजुर, बांधकाम कामगार हे काम बंद असल्याने घरीच थांबले आहेत. रोजचे काम बंद असल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. राज्य सरकार व कामगार विभाग तसेच काही स्वयंसेवी संस्था या कामगारांना अन्न-धान्य, जेवण पुरवण्याची जबाबदारी घेत आहे. पण किती दिवस हे संकट समोर असणार आहे, हे माहित नसल्याने या कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक कंपनी मालक, बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून कामगारांची काळजी घेणे गरजेचे आहे.

केंद्र व राज्य सरकारचे कामगारांना वेतन देण्याचे आदेश असुनसुद्धा काही कंपनी आस्थापना, ठेकेदार हे कामगारांना वेतन देत नाहीत. त्यामुळे राज्यासह, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील सर्व कंपनी, उदयोगधंदे, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांनी कोरोना संकटकाळी लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या आस्थापनांनामध्ये काम करणा-या कामगारांची माहिती घेऊन व शासनाच्या आदेशाचे पालन करून, या कामगारांना संकटकाळात वेतन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने इरफान सय्यद यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.