Pimpri : क्रीडांगणासाठीची आरक्षित जागा नव्या भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज – ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत ‘एरिया बेस डेव्हलपमेंट’ या तत्वावर पिंपळे-गुरव येथील आरक्षित जागेवर खेळाचे मैदान विकसित करण्याचे नियोजन आहे. मात्र, ‘टीडीआर’च्या बदल्यात जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत मालमत्ताधारक प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ही जागा नवीन भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह पिंपरी – चिंचवड शहराचाही समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय पायाभुत सुविधा (एरिया बेस डेव्हलपमेंट) या तत्वावर शहर विकसित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील पिंपळे-सौदागर आणि पिंपळे-गुरव हा परिसर विकसित करण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या कामाअंतर्गत पिंपळेगुरव येथील सर्व्हे 41 मध्ये खेळाचे मैदान विकसित करण्याचे नियोजन आहे. या आरक्षणाचे क्षेत्र एक हेक्टर एवढे आहे. यापैकी 0.49 हेक्टर महापालिकेच्या ‘टीडीआर’ने ताब्यात आलेले आहे. उर्वरीत 0.51 हेक्टर एवढे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आलेले नाही. हे क्षेत्र ‘टीडीआर’च्या बदल्यात महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत मालमत्ताधारकाला वारंवार विनंती केली आहे.

परंतु, मालमत्ताधारक प्रतिसाद देत नाही. तसेच 16 सप्टेंबर 2019 रोजीच्या पत्राद्वारे पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे क्षेत्र भूसंपादनाच्या महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबतची मागणी केली आहे. त्यानुसार, या जमिनीचे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार, सह भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क या नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादन करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.