Pimpri : ‘लेटलतिफ’ अधिका-यांवर कारवाई करा, दुजाभाव करु नका’

आयुक्तांचे विभागप्रमुखांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी महिन्यात तीनवेळा उशिरा आल्यावर त्यांच्यावर लेटलतिफची कारवाई प्रत्येक महिन्यात करावी. त्यात दुजाभाव करु नये, विलंब करण्यात येऊ नये. त्याचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी पाठविण्यात यावा. तीन लेटबाबतची कारवाई विलंबाने केल्यास संबंधित आस्थापना कर्मचारी, आहरण वितरण अधिकारी, विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दैनंदिन उपस्थितीसाठी बायोमेट्रीक थंब प्रणाली आहे. एका महिन्यात तीनवेळा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा थंब इंम्प्रेशन उशिराने केल्यास कर्मचा-यांची तीन लेटकरिता एक किरकोळ रजा खर्ची टाकण्याची कारवाई करण्याचे आदेश आहेत. तथापि, काही विभाग तीन लेटची कारवाई प्रत्येक महिन्यात करत नाहीत. तीन, सहा महिन्यानंतर अथवा लेखापरीक्षणामध्ये आक्षेप घेतल्यास तीन लेटबाबतची रजा कपातीची एकत्रित कारवाई करुन अहवाल सादर केला जातो. ही बाब योग्य नाही. एकत्रित रजा कपातीमुळे सेवानिवृत्तीनंतर अर्जीत रजा रोखीकरणावेळी आर्थिक नुकसान होऊन याबाबतच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे उशिरा येणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरोधातील कारवाई नियमितपणे करावी. कारवाईचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी पाठविण्यात यावा. स्थानांतरणापूर्वीचे तीन लेटबाबतची कारवाईची जबाबदारी पूर्वीच्या विभागाचीच राहील. या कारवाईत दुजाभाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे बायोमेट्रीक थंब उपस्थिती नोंदविण्यातून सवलत देण्यात आलेल्या अधिका-यांच्या बाबतीत सवलतीचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

माहिती व तंत्रज्ञान विभागाने बायोमेट्रीक थंब इम्प्रेशनचा मासिक अहवाल वेळचेवेळी विभागांना पाठविण्याची दक्षता घ्यावी. तीन लेटच्या कारवाईच्या अहवालाबाबत भविष्यात काही तक्रारी उद्धभवल्यास त्यास विभागप्रमुख जबाबदार राहतील. ज्या महिन्यात कर्मचारी उशिरा आले नसल्यास निरंक अहवाल पाठविण्यात यावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.