Pimpri: महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा राजीनामा

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांनी आज (मंगळवारी) पदाचा राजीनामा दिला. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार साने यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी  दरवर्षी  विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता आहे. तसेच विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे.

  • पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल यांना विरोधी पक्षनेतेपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती.

साने यांची 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ 17 मे 2019 रोजी संपुष्टत आला आहे. साने यांची वर्षभराची कामगिरी सरस राहिली. त्यांनी विविध विषयांवर आवाज उठविला. विविध प्रश्नांवार ‘हटके’ पद्धतीने आंदोलने केली. चुकीच्या कामाविरोधात सातत्याने आवाज उठवून सत्ताधा-यांना जेरीस आणले. 

  • पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साने यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार साने यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.