_MPC_DIR_MPU_III

Pimpri: विधानसभेची जागा शिवसेनेकडेच राहणार

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप-आरपीआय (रिपाइं)ची महायुती झाली आहे. विधानसभा निवडणुकीला युती कायम राहणार आहे. पिंपरी विधानसभेचे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा पिंपरीची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सन 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली नव्हती. भाजप-आरपीआयची युती होती. युतीकडून आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले होते.

_MPC_DIR_MPU_II
  • लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची पुन्हा युती झाली. आरपीआय देखील त्यांच्यासोबत आहे. तीनही पक्ष एकत्रित विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विद्यमान आमदार असल्याने पिंपरीवर शिवसेनेचा दावा आहे. तर, आरपीआयने देखील दावा केला आहे. दुसरीकडे भाजपचे सहा ते सातजण पिंपरीतून लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे युतीमध्ये पिंपरीच्या जागेसाठी रस्सीखेच होणार आहे, हे स्पष्ट आहे.

याबाबत विचारले असता श्रीरंग बारणे म्हणाले, विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. परंतु, पिंपरी विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. गौतम चाबुकस्वार हे तिथले आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. लोकसभा निवडणुकीतही पिंपरी विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य शिवसेनेला मिळाले आहे. त्यामुळे पिंपरीची जागा ही शिवसेनेकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.