Pimpri : बेरोजगार युवकांसाठी महापालिका राबवणार ‘लाईट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प’

एमपीसी न्यूज – बेरोजगार आणि शाळाबाह्य युवक-युवतींसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून ‘लाईट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प’ राबविणार आहे. या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वयोगटातील युवकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. ही संस्था पुणे महापालिकेत लाईट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प राबवित आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाच वर्ष हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे. त्यानंतर पिंपरी गावातील जुने ड क्षेत्रीय कार्यालयाच्या जागी सुरु असलेल्या मनपा शाळेच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या दोन टप्प्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध इमारतींमध्ये हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे.

फाउंडेशन या प्रकल्पासाठी स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमात लोकसभाग वाढविण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समूह संघटक सहकार्य करतील. प्रशिक्षण घेतलेल्या 50 टक्के लाभार्थींना फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहेत. या उपक्रमाचे समन्वय अधिकारी म्हणून नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त काम पाहणार आहेत. हा विषय पालिका आयुक्तांनी मंजूर केला असून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.