Pimpri: भाजपाचे स्थानिक नेते षडयंत्र रचण्यात माहीर, विलास मडिगेरी मारहाण प्रकरण पूर्णपणे बनाव; राष्ट्रवादी, शिवसेनेचे  पोलीस आयुक्तांना निवेदन

Local BJP leaders specialize in conspiracy, make up the Vilas Madigeri assault case completely; Statement of NCP, Shiv Sena to the Commissioner of Police

एमपीसी न्यूज – भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहरातील नेते धूर्त आणि कपटी आहेत. षडयंत्र रचण्यात ते माहीर आहेत.  विलास मडिगेरी मारहाण प्रकरण पूर्णपणे बनाव आहे. कलाटे बंधूंची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे. भाजपच्या षडयंत्रातून मडिगेरी यांनाच धोका आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी केली  आहे.

तसेच मडिगेरी हे नाटक करून रुग्णालयात दाखल आहेत की या मागे भाजपाच्या काही नेत्यांचे षडयंत्र आहे, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांकडे केली  आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे.  विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात  स्थायी समितीचे माजी सभापती  विलास मडिगेरी यांनी जो प्रकार घडवून आणला तो जाणिवपूर्वक आणि मोठ्या कटाचा एक भाग असल्याचे आमच्या निदर्शनास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे.

विलास मडिगेरी हे स्थायी समितीचे सदस्य नसतानाही ते मंगळवारी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे हे ज्या ठिकाणी बसले होते, त्या ठिकाणी आले.

शहराच्या विकासात ज्या गावकऱ्यांचे योगदान आहे.  अशा जमीन मालकांना योग्य मोबदला मिळावा व महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना धन्वंतरी योजना असावी अशी मागणी आहे.

परंतू,  भाजपच्या ठराविक लोकांनीच पैसे लाटण्याचा डाव करून विमा योजना आखली. त्याबाबतच्या चर्चेत मडिगेरी यांनीच ‘गाववाल्यांनीच  महापालिका लुटली’,असा शब्द वापरला.

त्यातच या शहराच्या विकासात ज्याची एक  इंचही  जागा गेली नाही. त्याने जमीन मालकांचा मोबदला काय असावा हे धोरण ठरवणे म्हणजे ज्या ज्या गावकऱ्यांची जागा आरक्षणात गेली त्यांचा अपमान आहे. अशा चर्चेतूनच वादावादी झाली.    पण शहराचा फायदा पाहूनच आमचे मत स्पष्ट सांगितले म्हणूनच मडिगेरी यांनीच वाद उकरून काढला असे समजते.

या शहरात  गेल्या 15 वर्षात असा प्रकार घडलेला माहिती नाही. जाणिवपूर्वक या दोघांबरोबर त्यांनी भांडणे केली. हे दोघे या ठिकाणाहून निघून जात असताना मडिगेरी यांनी त्यांना भांडणे करण्यास प्रवृत्त करून कॉलर पकडून अरेरावीची भाषा करत भांडणास सुरुवात केली. यावेळी अत्यंत छोटासा वादविवाद झाला.

_MPC_DIR_MPU_II

असे असतानाही मडिगेरी हे नाटकी आव आणत पहिल्यांदा स्वतः चालत जाऊन वायसीएम व त्यानंतर बिर्ला हॉस्पीटमध्ये ॲडमीट झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते त्या ठिकाणी ॲडमीट आहेत.

वस्तुत: किरकोळ वादावादी झालेली असतानाही त्याला भारतीय जनता पक्षाकडून जाणिवपूर्वक मोठे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनतेमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.

भाजपचे अनेक सदस्य सुध्दा व समर्थक गावकरी जमीन मालकांच्या हिताचा विचार असल्याने आम्हाला पाठिंबा देत आहेत. राहूल कलाटे व मयूर कलाटे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तरुण लोकप्रतिनिधी आहेत. मोठे कटकारस्थान रचून या दोघांना राजकारणातून संपविण्याचा डाव आखण्यात भाजपचे काही प्रमुख  लोक व्यस्त आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे हे गुन्हे दाखल आहेत.

विलास मडिगेरी यांच्या माध्यमातून अत्यंत घाणेरडे राजकारण भाजपाच्या लोकांकडून खेळले जाण्याची भिती आम्हाला वाटत आहे. किरकोळ स्वरुपाची देखील दुखापत नसताना मडिगेरी यांच्यावर बिर्ला रुग्णालयात सुरू असलेले उपचार हा त्याच कटाचा एक भाग आहे. बिर्ला रुग्णालयातील अनेक ठेके हे भाजपाशी संबंधित लोकांशीचे  आहेत. तर या रुग्णालय प्रशासनाशी भाजपाच्या नेत्यांचे संबंध आहेत.

या शिवाय पिंपरी चिंचवड महापालिका ही बिर्ला रुग्णालयाला अनेक सुविधा मोफत पुरविते. भाजपाची सत्ता महापालिकेत असल्यामुळे या रुग्णालयावर भाजपाच्या नेत्यांचा दबावही असू शकतो. या दबावातून आपणाला हवे  तसेच रिपोर्ट बनवून ते घेऊ शकतात.

तसेच मडिगेरी यांच्या बाबतीत ते हॉस्पीटलमध्ये काही अनपेक्षित कट घडवून आणू शकतात. या पाठीमागे घातपात घडवून आणण्यासारखे घाणेरडे राजकारणही भाजपाची मंडळी करू शकतात. त्यामुळे मडिगेरी यांना पोलीस बंदोबस्त देऊन त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे.

कलाटे बंधूंचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याबरोबरच राज्यातील महाविकास आघाडी सरकारची व राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बदनाम करण्याचेदेखील या संपूर्ण प्रकारामागे षडयंत्र असणार व तीच कपटी कारस्थाने भाजपची ठराविक लोक प्रोफेशनल पद्धतीने करत असतात.

भाजपाच्या राज्य आणि देशपातळीवरील लोकांनी अशी षडयंत्रे रचून यापूर्वी काही ठिकाणी विरोधी पक्षांना अडचणीत आणल्याची अनेक उदारहणे आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.