BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: वॉर्ड सेंटरच्या जागेवरील गृहप्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अजमेरा कॉलनीतील आरक्षण क्रमांक 77 आणि 79 येथील वॉर्ड सेंटर आणि उद्यानाच्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए)आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याला विरोध करत स्थानिक नागरिकांनी आज (सोमवारी) महापालिकेवर मोर्चा काढला.

अजमेरा कॉलनीत अंतरीक्ष, सागर, ग्रीन फिल्डस सोसायटी, मनिष गार्डन, मेगा हाईट्‌स आणि स्वप्ननगरी अशा सोसायट्या आहेत. अंतरीक्ष आणि सागर या दोन्ही सोसायट्यांच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेवर वॉर्ट सेंटर आणि उद्यानाचे आरक्षण होते. तथापि, महापालिकेने उद्यानाचे आरक्षण उठवून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्सवन आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

  • प्रभाग क्रमांक 9 मधील आरक्षण क्रमांक 77 येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तर आरक्षण क्रमांक 79 येथे झोपटपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. वॉर्ड सेंटर आणि उद्यानाच्या आरक्षित जागेत काम केले जात असल्याने स्थानिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. आरक्षण उठविल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिका-यांनी तेथे येऊन जागेची मोजणी केली होती.

त्याच्या विरोधात स्थानिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, वीणा सोनवलकर, आशा काळे, सतिश बो-र्डे, गिरीधर काळे, शंकर पिल्ले, नरसिह्मन, संभाजी मगर, विभुते, गुप्ते, अजित पालांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • आमदार महेश लांडगे यांनी पालिका मुख्यालयात आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि बाजू जाणून घेतली. तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम थांबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना स्थानिकांची मते, समस्या जाणून घेण्यासही त्यांनी सांगितले.

”वॉर्ड सेंटरचे आरक्षण उठविण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. कोणालाही विचारात न घेता आरक्षण उठविले आहे. त्याचा जागी गृहप्रकल्प बांधण्यात येत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. त्याच्या विरोधात स्थानिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये लक्ष घातले. प्रभारी शहर अभियंता राजन पाटील यांच्याशी संवाद साधला. 24 तारखेपर्यंत काम बंद ठेवण्यात येणार आहे. आयुक्त आल्यानंतर स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल”, असे आश्वासन दिल्याचे वीणा सोनवलकर यांनी सांगितले.

Advertisement