Pimpri Lockdown News : ‘ब्रेक द चेन’ ! शहरातील निर्बंध 1 जूनपर्यंत कायम

परराज्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेले निर्बंध राज्य सरकारकडून 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत देखील 1 जूनपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी निर्गमित केलेले आदेश 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत ‘जैसे थे’ राहणार आहेत. परराज्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत असणे बंधनकारक केले आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ब्रेक द चेन अंतर्गत आज (गुरुवारी) सुधारित आदेश काढले आहेत. 30 एप्रिल रोजी लागू केलेल्या आदेशाची मुदत 15 मे रोजी संपत आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार अद्याप कमी झालेला नाही. रुग्णवाढ सुरूच असल्याने निर्बंध 15 मे पासून पुढे 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

14, 17, 20, 22 आणि 30 एप्रिल रोजी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी- चिंचवड शहरात अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना 48 तास वैधता असणारे कोरोना निगेटिव्ह असणारा आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. राज्य सरकारने 18 एप्रिल, 1 मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील मार्गदर्शक सूचना, अटी लागू राहतील.

माल वाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये फक्त दोन व्यक्तींना (चालक, मदतनीस) परवानगी राहील. महाराष्ट्र राज्याबाहेरून माल घेऊन येणाऱ्या माल वाहतूक वाहनांचे चालक, मदतनीस यांनी 48 तास वैधता असणारे कोरोना निगेटिव्ह असणारे आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. ते सात दिवस वैध राहील.

किरकोळ विक्री, होम डिलिव्हरीकरिता वेळेचे बंधन असले तरी, दूध संकलन, त्याची वाहतूक व प्रक्रिया कोणत्याही प्रतिबंधाशिवाय सुरू राहतील. किरकोळ, कार्गो सर्व्हिसेस आणि कोरोना संबंधित औषधे, उपकरणे यांची मालवाहतूक यासाठी आवश्यक असलेले अधिकारी, कर्मचारी यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी राहील, असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.